तेलंगणमधील भाजपच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल

हैदराबाद –तेलंगणमधील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांच्या विरोधात रविवारी हैदराबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तर प्रदेशातील मतदारांना उद्देशून धमकीवजा भाषा वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या आदेशावरून ते पाऊल उचलण्यात आले.
काही दिवसांपूर्वी सिंह यांची एक व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध झाली. त्या क्लिपमुळे राजकीय वादंग निर्माण झाले. उत्तर प्रदेशच्या मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करताना सिंह यांनी धमकीवजा भाषा वापरली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजारो जेसीबी आणि बुलडोझर मागवले आहेत.
भाजपला मतदान न करणाऱ्यांनी ते ध्यानात ठेवावे. उत्तर प्रदेशात राहायचे असेल तर योगी-योगी म्हणावे लागेल हा जेसीबी आणि बुलडोझर मागवण्यामागील हेतू आहे, असे त्यांनी म्हटले. त्या क्लिपची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने सिंह यांच्यावर 72 तासांची प्रचारबंदी घातली.
त्याशिवाय, सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेशही आयोगाने तेलंगणच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिला. त्या आदेशानुसार सिंह यांच्या विरोधात हैदराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





