पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेला त्यांच्या गृहप्रकल्पास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेताना सोसायटीधारकांना ते “स्वखर्चाने पाणीपुरवठा करतील’ असे शपथेवर लिहून दिले आहे. मात्र, सोसायटीधारकांना स्वखर्चाने पाणी न पुरवता लिहून दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केले जात आहे. अशा बांधकाम व्यावसायिकांवर भारतीय दंड संहिता कलम 200 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चिखली-मोशी-चऱ्होली- पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये आयुक्त दालनात फेडरेशनचे पदाधिकारी आणि आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत 30 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीचा संदर्भ देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिक हे त्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पांना भाग पूर्णत्वाचा दाखला घेताना तसेच पूर्णत्वाचा दाखला घेताना हे विकसक सोसायटीधारकांना स्वखर्चाने पाणीपुरवठा करतील असे शपथेवर हमीपत्र लिहून देऊन बांधकाम पूर्णत्वाचे दाखले घेतात. परंतु, त्यानंतर एकही बांधकाम व्यावसायिक सदनिकाधारकांना त्यांच्या स्वखर्चाने पाणी पुरवत नाही. उलट सदनिकाधारकांकडून घेतलेल्या आगाऊ देखभाल खर्चातूनच हा खर्च करतात. कायदा काय सांगतो… भारतीय दंड संहिता कलम 200 नुसार जर एखाद्या नागरिकाने किंवा एखाद्या कंपनीच्या समूहाने किंवा एखाद्या व्यावसायिकाने शपथेवर लिहून दिलेल्या हमीपत्राचे उलंघन केले तर हा भारतीय दंड संहिता कलम 200 नुसार गुन्हा आहे. तसेच, हमीपत्रा व्यतिरिक्त सदनिकाधारकांची फसवणूक करण्यासाठी हे बांधकाम व्यावसायिक ग्राहकांकडून त्यांच्या करारनाम्यामध्ये सदनिकाधारक विकत घेतल्या जाणाऱ्या पाण्याचा खर्च स्वतः करतील असा कुठलाही उल्लेख करणार नाहीत असे देखील या लिहून घेणाऱ्या हमीपत्रामध्ये स्पष्टपणे उल्लेख करावा आणि नागरिकांची आणि पिंपरी चिंचवड मनपाची होणारी फसवणुकीला आळा घालावा. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम पूर्णत्वाचे दाखले घेताना स्वतः स्वखर्चाने आम्ही सदनिकाधारकांना पाणीपुरवठा करतील असे हमीपत्र लिहून दिलेले आहे. त्यांना हमीपत्रानुसार सोसायटीधारकांना पाणी पुरविण्याचे आदेश दिले पाहिजेत, असेही फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी म्हटले आहे. शहरातील बहुतेक बांधकाम व्यावसायिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये स्वखर्चाने पाणीपुरवठा करेल अशा लिहून दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केलेले आहे. याबाबत आम्ही वारंवार आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना अवगत केलेले आहे. तरीदेखील प्रशासनाकडून अशा सर्व बांधकाम व्यावसायिकांना पाठीशी घातले जात आहे. प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून संगणमताने आमची पिळवणूक चालू आहे. – संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.