पुणे : मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरणात दोन एफआयआर दाखल झाल्या असून, बावधन प्रकरणात केवळ मुद्रांक शुल्क बुडविल्याची तक्रार आहे. त्यामुळे पुढे फारसे काही निष्पन्न होणार नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. या प्रकरणातील गुन्ह्याची सविस्तर माहिती आपण पोलीस आयुक्त आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिल्याचे त्यांनी सांगितले. टप्प्याटप्प्याने पोलीस कारवाई सुरू असली तरी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका दमानिया यांनी मांडली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांची भेट घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. दमानिया म्हणाल्या, या संपूर्ण प्रकरणात एकच एफआयआर आणि एकच तपास अधिकारी असणे गरजेचे आहे. अन्यथा तपासाची दिशा भरकटू शकते. खारगे समितीसमोर दिग्विजय पाटील हजर राहत नसतील, तर पार्थ पवार कधी हजर होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दिग्विजय पाटील यांना पोलिसांनी बोलावल्यावर त्यांची गोडीगुलाबी चौकशी झाल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांना ही केस लोक विसरून जातील, अशी अपेक्षा असल्याचे सांगत दमानिया म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए हे अमेडिया कंपनीच्या लोकांशी सातत्याने संपर्कात होते. मुंढवा येथे जागा ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या गुंडांच्या कारवायांची माहिती अजित पवार यांना होती, असा दावाही त्यांनी केला.