शिक्रापूर -आरणगाव (ता. शिरूर) येथील दगडेवस्ती येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. शिक्रापूर पोलीस स्टेशन ठाण्यात दोन्ही गटांच्या नऊ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरणगाव येथील इंदुबाई दगडे व छाया दगडे यांच्यामध्ये जमिनीच्या रस्त्याचा वाद आहे. त्या दोन्ही गटांमध्ये रस्त्याच्या वादातून मोठा वाद झाला आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली आहे.
याबाबत इंदूबाई भागुजी दगडे (रा. आरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी भाऊसाहेब बाळासाहेब दगडे, बाळासाहेब दिनकर दगडे, दिनकर मुकिंदा दगडे, गणेश बाळासाहेब दगडे, छाया बाळासाहेब दगडे, कविता बाळासाहेब दगडे (सर्व रा. आरणगाव दगडे वस्ती) यांच्या विरोधात तर छाया बाळू दगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी विनायक भागुजी दगडे, भागुजी दगडे, इंदूबाई भागुजी दगडे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.