शिरूर : येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी (दि. १६) सकाळी एका कर्मचाऱ्याशी झालेल्या धक्काबुक्की व शिवीगाळीच्या घटनेमुळे आरोग्य सेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अर्धा तास कामबंद आंदोलन केले आणि रुग्णालयात तातडीने सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. ओपीडीची वेळ संपल्यानंतर कर्मचारी किरण सोनवणे यांच्याजवळ एक व्यक्ती आला. का आलात, अशी चौकशी केली असता, त्या व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे देत अचानक शिवीगाळ सुरू केली आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचारी घाबरले. मात्र, इतर कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला रुग्णालयाबाहेर काढले. या घटनेनंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संदीप लगडे आणि महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्ष इंदुमती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफ नर्सेस, तांत्रिक कर्मचारी व अन्य २६ कर्मचाऱ्यांनी अर्धा तास कामबंद आंदोलन केले. रुग्णालय परिसरात गृहरक्षक दलाचे जवान नेमणे, सीसीटीव्ही व सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी गजानन टीमकरे, सुनील कोतकर, शोभा गायकवाड, रोहिणी तांदूळकर, मंगल पवार आदी कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाकडून योग्य ती सुरक्षा व्यवस्था करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले, अशी माहिती संदीप लगडे यांनी दिली. यापूर्वीही सुरक्षेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.