FIFA World Cup : तुर्की व पेराग्वे संघातील खेळाडूंमध्ये तुंबळ हाणामारी; नेमकं काय घडलं?
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये (FIFA World Cup) सध्या बाद फेरीत (नॉकाउट) पोहोचण्यासाठी सर्वच संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. प्रत्येक गटातून पुढे जाण्यासाठी खेळाडू मैदानात रक्ताचे पाणी करत आहेत.

FIFA World Cup : फिफा विश्वचषक २०२६ मध्ये (FIFA World Cup) सध्या बाद फेरीत (नॉकाउट) पोहोचण्यासाठी सर्वच संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. प्रत्येक गटातून पुढे जाण्यासाठी खेळाडू मैदानात रक्ताचे पाणी करत आहेत.
दरम्यान, ड गटातील अत्यंत चुरशीच्या सामन्यात १० खेळाडूंसह खेळणाऱ्या पेराग्वेने तुर्कीचा १-० असा पराभव केला. या पराभवासोबतच फिफा विश्वचषक २०२६ मधून बाहेर पडणारा ‘पहिला संघ’ ठरण्याची नामुष्की तुर्कीवर ओढवली आहे.
दुसरीकडे, यजमान मेक्सिको आणि अमेरिका या दोन्ही संघांनी (FIFA World Cup) दमदार कामगिरी करत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे, तर तुर्की आणि हेती या दोन संघांचे स्पर्धेतील आव्हान अधिकृतपणे संपुष्टात आले आहे.
पहिल्या हाफनंतर खेळाडूंमध्ये जोरदार हाणामारी
तुर्की आणि पेराग्वे यांच्यातील हा सामना केवळ निकालामुळेच नाही, तर मैदानावरील अभूतपूर्व राड्यामुळेही चर्चेत आला आहे. संपूर्ण पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी अत्यंत आक्रमक खेळ केला. अनेक कठोर टॅकल्स, एकमेकांना पाडणे आणि शाब्दिक चकमकींमुळे मैदानावरील वातावरण आधीच तापलेलं होतं.
पहिल्या ४५ मिनिटांचा खेळ संपल्याची (हाफटाइम) शिट्टी वाजली आणि खेळाडूंचा संयम सुटला. मध्यरेषेजवळ दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, ज्याने पाहता पाहता उग्र रूप धारण केले. टीव्ही स्क्रीनवर दोन्ही बाजूंचे खेळाडू मोठ्या समूहाने एकमेकांवर धावून जात असताना दिसले. त्यांच्यात जोरदार धक्काबुक्की आणि ढकलाढकली सुरू झाली.
Türkiye-Paraguay maçında ilk yarının bitiş düdüğünün ardından sahada tartışma çıktı. pic.twitter.com/bDfhFgsT7t
— Popüler Gazete (@populergazeteTR) June 20, 2026
हा वाद इतका वाढला की खेळाडूंना वेगळे करण्यासाठी सामनाधिकारी, दोन्ही संघांचे मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला मैदानात धाव घ्यावी लागली. या गोंधळामुळे खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये परत जाण्यासही बराच उशीर झाला आणि सामना काही काळ थांबवावा लागला. सध्या या हाणामारीचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
फिफाकडून कडक कारवाईचे संकेत
मैदानावर झालेल्या (FIFA World Cup) या अशोभनीय वर्तनाची फिफाने (FIFA) गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर संबंधित खेळाडूंवर शिस्तभंगाची कडक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. सामनाधिकारी आणि शिस्तपालन समिती या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ फुटेज आणि अधिकृत अहवाल तपासत आहेत.
अहवालानुसार दोषी आढळणाऱ्या खेळाडूंवर मोठा आर्थिक दंड, अतिरिक्त पिवळी किंवा लाल कार्डे देणे, अथवा आगामी सामन्यांमधून थेट निलंबन (सस्पेंशन) अशी मोठी कारवाई फिफाकडून केली जाऊ शकते.






