fennel seeds benefits: जेवणानंतरची छोटीशी सवय ठरते फायदेशीर; जाणून घ्या बडिशेपचे आरोग्यदायी फायदे…

fennel seeds benefits: आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारी बडिशेप ही केवळ मसाल्याची चवच वाढवत नाही तर ती पचनसंस्थेसाठीही उत्तम औषध मानली जाते. आयुर्वेदात बडिशेपचे अनेक उपयोग सांगितले आहेत. जेवणानंतर बडिशेप खाल्ल्याने जड अन्न सहज पचते, तोंडाला स्वाद येतो आणि आतड्यांची हानी टळते.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पोटातील गॅस, अपचन, अजीर्ण, जुलाब यांसारख्या तक्रारींमध्ये बडिशेपेचा काढा किंवा अर्क उपयुक्त ठरतो. मुलांना दात येण्याच्या काळात होणाऱ्या जुलाबांवरही बडिशेप चूर्ण फायदेशीर मानले जाते.
बडिशेप नियमित खाल्ल्यास भूक न लागणे, स्मरणशक्ती कमी होणे यांसारख्या समस्या कमी होतात. मधासोबत बडिशेप घेतल्यास भूक वाढते, तर तूप मिसळून घेतल्यास बुद्धी तरतरीत राहते. तापामध्ये अंगाची आग होत असल्यास किंवा जिभेला शोष पडल्यास बडिशेपेचा काढा खडीसाखर टाकून प्यायल्याने आराम मिळतो.

महिलांच्या मासिक पाळीतील पोटदुखी, लघवीतील त्रास, तसेच उलट्या होणे, कोरडा खोकला यावरही बडिशेप उपयुक्त ठरते. सूज व वेदनांमध्ये बडिशेप, ओवा व सैंधव पूड गरम करून शेक दिल्यास वेदना कमी होतात.
याशिवाय बडिशेपेचे सरबत पचनशक्ती सुधारते, उष्णता कमी करते आणि पौष्टिकतेसाठी फायदेशीर असते. बडिशेप, ज्येष्ठमध व खडीसाखरेचे चूर्ण झोपण्यापूर्वी घेतल्यास पोट साफ होते व उष्णतेमुळे होणारे विकार कमी होतात. तसेच बडिशेप, वेलची व खजुरापासून तयार केलेले बलदायी पेय ऊर्जा वाढवते आणि शरीराला ताकद देते.
एकूणच, बडिशेप ही घराघरात सहज मिळणारी, परंतु आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक औषधी आहे. लहानशा चमचाभर बडिशेपमध्ये आरोग्य राखण्याचे मोठे सामर्थ्य दडलेले आहे.

