महिला कर्मचाऱ्याचा कार्यालयातच मृत्यू; लखनौच्या एचडीएफसी बँकेतील घटना

लखनौ : लखनौमधील एचडीएफसी बँकेतील महिला कर्मचाऱ्याचा काम करत असताना गूढ परिस्थितीत मृत्यू झाला आहे. मिळालेल्या बातमीनुसार ही 45 वर्षीय महिला अचानक तिच्या खुर्चीवरून पडली आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला. सदफ फातिमा असे त्यांचे नाव असून त्या ४५ वर्षांच्या होत्या. त्या एचडीएफसी बँकेच्या विभूतिखंड शाखेमधील अतिरिक्त उपाध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. पोस्टमॉर्टम केल्यानंतरच मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल, असे विभूतिखंडचे सहाय्यक पोलिस आयुक्त राधारमण सिंह यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले. एका माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार सदफ फातिमा यांच्या सहकाऱ्यांनी असा दावा केला आहे की सदफ यांच्यावर कामाचा दबाव होता.
दरम्यान, अर्न्स्ट आणि यंगच्या एका महिला कर्मचाऱ्याने कथितपणे अति कामामुळे आत्महत्या केल्याची घटना अलिकडेच घडली आहे. या प्रकरणानंतरच कामाच्या ठिकाणी असलेल्या दबावाबाबत देशव्यापी चर्चा सुरू असतानाच ही दुसरी घटना घडली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ही घटना अत्यंत चिंताजनक आणि देशाच्या सध्याच्या आर्थिक ताणाचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले आहे. ही शोकांतिका कंपन्या आणि सरकारी विभागांनी त्यांचे प्राधान्यक्रम आणि कामकाजाच्या परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन करण्याची आवश्यकता अधोरेखित करते असेही त्यांनी म्हटले आहे.
सर्व कंपन्या आणि सरकारी विभागांना याबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. हे देशाच्या मानव संसाधनाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. अशा आकस्मिक मृत्यूंमुळे कामकाजाच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे अखिलेश यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कोणत्याही देशाच्या प्रगतीचे खरे मोजमाप हे सेवा किंवा उत्पादनांच्या आकडेवारीतील वाढीवरून ठरत नाही तर एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या किती मुक्त, निरोगी आणि आनंदी आहे हे यावरून ते ठरत असते असे त्यांनी म्हटले आहे.





