मी मंत्री होणार या भीतीमुळे “ठरलंय’वाले एकत्र : जयकुमार गोरे

सातारा – जयकुमार गोरे हे आमदार असताना बारामती आणि फलटणकरांना मेचत नव्हते. आता मंत्री झाल्यावर आपलीही वाट लावेल, या भीतीने “ठरलंय’वाल्यांना एकत्र येण्यास भाग पाडले आहे. मतदारसंघाच्या विकासाचा अजेंडा नसतानाही हे टोळके एकवटल्याचे जनतेलाही समजले आहे. त्यांनी कितीही ताकद लावली तरी महायुतीच्या माध्यमातून मी पुन्हा विधानसभेत जाणार आहे, असा विश्‍वास जयकुमार गोरे यांनी व्यक्‍त केला. बडीव बैलांनी आपली तोंडे आवरावीत अन्यथा त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

बिजवडी, कुळकजाई परिसरातील कोपरा सभांमध्ये ते बोलत होते. भाजप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, निवडणूक आली की काही गडी घुमायला लागले आहेत. त्यांना प्रत्येक निवडणुकीत आमदार झाल्यासारखे वाटते. मात्र, अत्यंत खालच्या पातळीचे विचार असणाऱ्यांच्या टोळक्‍याने एकाला दाढेला दिले आहे. मी गेल्या दहा वर्षात समाजकारण करताना जातीचे राजकारण केले नाही. विरोधी टोळक्‍याकडे विकासाचे व्हिजन नसल्याने त्यांनी जातीयवादी राजकारणाचा डाव टाकला आहे.

आयुष्यभर “टेबलाखालून’ घेणाऱ्याने निवडणुकीला उभे राहतानाही इतरांशी गद्दारी करून त्यांचीच बोली लावली. सर्वांनी मिळून कितीही जोर लावला तरी हा जयकुमार त्यांना सापडणार नाही. हा जयकुमार पाण्याची लढाई लढतोय. मतदारसंघात एमआयडीसी, रेल्वे आणण्यासाठी लढतोय. माझ्यावर टीका करताना, मी का नको, ते सांगा. तुम्ही मतदारसंघासाठी काय करणार ते सांगा. उगाच खालच्या पातळीवर जाऊन टीका कराल तर याद राखा.

जयाभाऊंची हॅट्ट्रिक निश्‍चित
आमच्याकडे जातीपातीच्या राजकारणाला थारा नाही. जयाभाऊ हे मोठ्या आवाक्‍याचे लोकप्रतिनिधी आहेत. मराठा समाजाकडून त्यांना प्रतिसाद मिळत असल्याने त्यांची हॅट्ट्रिक निश्‍चित असल्याचा दावा बिजवडी, कुळकजाई येथील पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला.

त्यांची चावी फलटणला…
मला अडवण्यासाठी बारामतीकरांनी सर्व चमच्यांना एकत्र आणले आहे. त्यांची चावी फलटण आहे. त्यांना साताऱ्यातूनही सपोर्ट मिळतोय. जयकुमार एकटा मेचणार नाही. त्याला चक्रव्यूहात अडकवा, असा फतवा निघाला आहे. मात्र, मीही काही कच्च्या गुरुचा चेला नाही. कितीही ताकद लावा, विधानसभेत मी जाणारच आहे आणि मंत्रीही होणार आहे, असा विश्‍वास जयकुमार गोरेंनी व्यक्त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)