Chakan News : वाहतूक कोंडीची धास्ती; चाकणमधील कंपन्या स्थलांतराच्या तयारीत?
Chakan News : चाकण औद्योगिक वसाहत आणि परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, मालवाहतूक करणारी वाहने, कामगारांच्या बस तसेच खासगी वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर वाहतुकीचे मार्ग बदलणे किंवा वाहतूक वळविण्याची वेळ आल्यास सध्याची वाहतूक कोंडी अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

चाकण : पुणे-नाशिक महामार्गाच्या रखडलेल्या कामाला आता वेग येण्याची शक्यता निर्माण झाली असूली तरी महामार्गाच्या कामादरम्यान होणार्या संभाव्य वाहतूक कोंडीचा फटका बसू नये, यासाठी चाकण औद्योगिक वसाहतीतील सुमारे 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. काही कंपन्यांनी पर्यायी औद्योगिक क्षेत्रांचा शोध सुरू केल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे या संभाव्य स्थलांतराचा चाकणच्या औद्योगिक क्षेत्रासह स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त होत आहे.
पुणे येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-नाशिक महामार्गाच्या कामासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. महामार्गासाठी आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया आणि जमीनमालकांना देण्यात येणारा मोबदला लवकर वितरित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे जमीन संपादन व मोबदला वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आहे.
चाकण औद्योगिक वसाहत आणि परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, मालवाहतूक करणारी वाहने, कामगारांच्या बस तसेच खासगी वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर वाहतुकीचे मार्ग बदलणे किंवा वाहतूक वळविण्याची वेळ आल्यास सध्याची वाहतूक कोंडी अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कामामुळे प्रवासाचा वेळ वाढणे, मालवाहतुकीला विलंब होणे, कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत होणे तसेच तयार मालाच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती उद्योगांकडून व्यक्त होत आहे. याशिवाय कामगारांच्या दैनंदिन ये-जा करण्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
महामार्गाचा विकास हा चाकणसह संपूर्ण औद्योगिक पट्ट्यासाठी आवश्यक असला, तरी विकासकामामुळे विद्यमान उद्योगांनी स्थलांतराचा निर्णय घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने उद्योग प्रतिनिधींशी समन्वय साधून उपाययोजना करणे आवश्यक आहे. महामार्गाच्या कामाला वेग येत असतानाच चाकणमधील सुमारे 20 कंपन्यांच्या संभाव्य स्थलांतराच्या चर्चेने उद्योगविश्वाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले आहे.
उद्योगांना स्थलांतराची धास्ती
चाकण परिसर हा पुणे जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक पट्ट्यांपैकी एक आहे. येथे विविध क्षेत्रांतील मोठ्या कंपन्यांसह लघु व मध्यम उद्योग कार्यरत आहेत. उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल, तयार मालाची वाहतूक आणि कामगारांची ये-जा यासाठी या उद्योगांचे दळणवळण व्यवस्थेवर मोठे अवलंबित्व आहे. याच पार्श्वभूमीवर चाकण औद्योगिक वसाहतीतील सुमारे 20 कंपन्यांनी संभाव्य वाहतूक कोंडी आणि वाढणार्या वाहतूक खर्चाचा विचार करून पर्यायी ठिकाणी स्थलांतराचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. काही कंपन्या टप्प्याटप्प्याने उत्पादन प्रकल्प अन्य औद्योगिक क्षेत्रांमध्ये हलविण्याच्या तयारीत असल्याचेही समजते.
स्थलांतराचा स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका?
चाकणमधील कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्यास त्याचा परिणाम केवळ औद्योगिक उत्पादनावरच नव्हे, तर स्थानिक रोजगार आणि पूरक व्यवसायांवरही होण्याची शक्यता आहे. वाहतूक व्यावसायिक, हॉटेल, खानावळ, किरकोळ विक्रेते, सेवा क्षेत्र तसेच उद्योगांवर अवलंबून असलेल्या अनेक लघु व्यवसायांनाही त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे महामार्गाचा विकास आणि औद्योगिक क्षेत्राचे हित यांचा समतोल साधण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
पर्यायी वाहतूक मार्गांचे नियोजन गरजेचे
पुणे-नाशिक महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर आणि नाशिकदरम्यानची वाहतूक अधिक वेगवान व सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, कामाच्या कालावधीत उद्योगांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आधीच ठोस वाहतूक आराखडा तयार करणे आवश्यक आहे. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग, पर्यायी वाहतूक व्यवस्था, वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त यंत्रणा, उद्योगांच्या मालवाहतुकीसाठी विशेष नियोजन तसेच कामाचे टप्पे निश्चित करून वाहतूक कोंडी टाळण्याच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.





