नगर -नगरच्या कापडबाजारातील एका मोठ्या दालनातील दोन कामगार काल करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकेलवार, प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे यांच्या पथकाने “त्या’ दालनाची पाहणी केली. कापडबाजारातील या दालनात कामगारांची संख्या खूप मोठी आहे. तसेच ते कामगार शहरातील विविध भागातून येत असल्याने प्रशासनाने सामूहिक संसर्गाची भीती व्यक्त केली आहे. तपासणीत या दालनातील दोन कामगार करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने बाकीच्या कामगारांना तातडीने क्वारन्टाइन करण्याची सूचना महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच या सर्वांनी तातडीने तपासणी करुन घ्यावी, अशा सूचनाही केल्या आहेत. नगरच्या मुख्य बाजारपेठेचा बहुतांश भाग गेल्या दोन दिवसांपूर्वीच बफर झोन घोषित केला होता. त्यामुळे नवी पेठमधून नालेगाव भागाकडे जाणारे सर्वच रस्ते पत्रे बांधून बंद करण्यात आले आहेत. आता कापडबाजारातील या दालनातील काही धोका निर्माण झाल्यास हा परिसर देखील बंद करण्याचे नियोजन महापालिका अधिकाऱ्यांनी केले आहे.