कराड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेला अभूतपूर्व गोंधळ हा निवडणूक आयोगाच्या अक्षमतेचा स्पष्ट पुरावा असल्याची टीका माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. नगरपालिका निवडणुकांचा निकाल ३ तारखेऐवजी आता २१ तारखेला जाहीर होणार असल्याने, मतयंत्रे सुमारे १६-१७ दिवस शासकीय गोदामात पडून राहतील. या काळात मतयंत्रांमध्ये ‘घालमेल’ करण्याची संधी सरकारला मिळू शकते, असा गंभीर संशय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. या वक्तव्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील गोंधळ आणि सरकारची भूमिका पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाच्या घेऱ्यात आली आहे. निवडणुका पुढे ढकलल्याने सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. या विस्कळीत प्रक्रियेमुळे लोकांचा निवडणुकांवरील विश्वास ढासळत चालल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली. “न्यायालयात सरकारच्या वकिलांनी प्रभावीपणे बाजू मांडली असती, तर निकाल पुढे गेला नसता. त्या पातळीवर सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आणि आता निवडणूक आयोगावर दोष ठेवण्यात अर्थ नाही,” असे परखड मत चव्हाण यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे भाजप सरकारने केलेले दुर्लक्ष म्हणजे लोकशाही संपवण्याचा प्रयत्न आहे. गेल्या दहा वर्षांत या निवडणुका न झाल्याने लोकशाही हक्काची पायमल्ली झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना चव्हाण म्हणाले, “निवडणूक आयोग चुकीचे वागले हे मान्य, पण न्यायालयात सरकारी वकील झोपले होते काय? तात्काळ निकाल हवा होता हे ठामपणे सांगण्यात सरकार अपयशी ठरले आणि संपूर्ण दोष आयोगावर टाकत आहे. शंभर टक्के चूक सरकारचीच आहे.” देशात हुकूमशाही हलक्या पावलांनी पुढे सरकत असल्याचा इशाराही त्यांनी दिला.