सातारा – शासनाच्या “स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानातील “ओडीएफ प्लस प्लस’ दर्जा सातारा पालिका गमावण्याची भीती आहे. मुंबईतून आलेल्या समितीच्या आगमनाबाबत अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये विसंवाद झाल्याने “स्वच्छ सर्वेक्षण’चा यंदा केवळ फार्स झाल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सात पालिकांना गतवर्षी शासनाचे “ओडीएफ प्लस प्लस’ मानांकन जाहीर झाले होते. स्वच्छतागृहांची देखभाल, दुरुस्ती, नूतनीकरण, नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा, सुविधा व हागणदारीमुक्तीसाठी केलेले प्रयत्न आदी निकषांची पूर्तता केल्याने शासनाकडून हे प्रमाणपत्र जाहीर झाले. शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात जिल्ह्यातील सर्वच पालिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हे अभियान वर्षभर चालत असले, तरी 4 ते 31 जानेवारी हा स्पर्धेचा कालावधी होता.
28 दिवस चाललेल्या या अभियानात साताऱ्यासह सर्वच पालिकांनी स्वच्छतेवर भर देत स्पर्धेच्या निकषांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. “ओडीएफ प्लस प्लस’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सातारा पालिकेकडून यंदा “बेस्ट टॉयलेट’ ही संकल्पना राबविली गेली. त्या अंतर्गत शहरातील 71 पैकी 18 सार्वजनिक स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करण्यात आले. तेथे वीज, 24 तास पाणी, महिलांसाठी वेंडिग व डिस्पोजल मशीन, वॉश बेसिन, आरसा, कमोड, पेपर नॅपकिन, एक्झॉस्ट फॅन, दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प, सुरक्षारक्षक आदी सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. केंद्रीय समितीने अचानक भेट देऊन या कामांची पाहणी केली होती.
याच सुविधांचा पुन्हा नाटकी फार्स करत सर्वेक्षण अभियानाच्या पथकाला केवळ तीन प्रभागातील टॉयलेटस् दाखविण्याचा करिष्मा 2021 च्या सर्वेक्षणात आरोग्य विभागाने घडविला. चिमणपुरा पेठेत जी “बेस्ट टॉयलेट’ या पथकाला दाखविण्यात आली, त्यातील काही शौचालयांच्या दारांना कडीच नसल्याचे नागरिकांनी दाखविल्याने आरोग्य विभागाचा दिखावा उघडा पडला. ही समिती दौऱ्यावर आल्याची कल्पना नगरसेवकांना देण्यात आली नसल्याने ओडीएफ प्लसचे मानांकन कागदावरच राहिल्याची भीती आहे.
सर्व निकष पूर्ण केल्याने महाराष्ट्रातील 113, तर सातारा जिल्ह्यातील सात पालिकांना ओडीएफ प्लस प्लस मानांकन जाहीर झाले आहे. त्यात सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, कराड, मलकापूर व रहिमतपूर नगरपालिकांचा समावेश आहे. सातारा पालिकेला यापूर्वी ओडीएफ प्लस हे मानांकन मिळाले होते; पण या मानांकनाला साजेशी कामगिरी यंदा करता न आल्याने पालिका हे मानांकन गमावतेय की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
1. ओडीएफ प्लस मानांकनात घसरण होण्याची भीती
2. बायोमायनिंगचा प्रकल्प पाहणाऱ्या समितीने कचरा डेपोची पडकी भिंत पाहिलीच नाही
3. 18 टॉयलेटच्या अत्याधुनिक सुविधांचा बोजवारा
4. आरोग्य विभागाचे फक्त कागदी घोडे
5. मुख्याधिकारी म्हणाले पथक आलेच नाही