निगडी- पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या अनेक पावसाळी नाल्यात सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्याचे पाणी वाहून नेहणाऱ्या नाल्यांचे कॉंक्रिटीकरण केल्याने पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे शहर परिसरातील भूजलपातळी खालवण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे निसर्गाची हानी होऊ शकते. त्यामुळे शहरातील नाल्यांमधील कॉंक्रिटीकरण काढून टाकावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने अनेक प्रकरणात असे नाल्यामध्ये सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यास मज्जाव केला आहे. तसे आढळून आल्यास सिमेंट कॉंक्रिटीकरण काढण्याचे सूचित केले आहे. नाशिक येथे गोदावरी नदीमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत केलेले कॉंक्रिटीकरण काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने दिले होते. त्यानुसार गोदावरी नदी पात्रातील कॉंक्रिटीकरण काढण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील शहरातील काही नाल्यांमध्ये सिमेंट कॉंक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे शहराच्या भूजलपातळी खालवली जाऊ शकते. तसेच शहराच्या सौंदर्यात भर घालणारे वृक्ष देखील कोलमडून पडू शकतात. त्यामुळे भूजलपातळी टिकून राहण्यासाठी महापालिकेने शहरातील पाणीटंचाई आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी नाल्यातील कॉंक्रिटीकरण काढून घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच नैसर्गिक प्रवाह, नदी, नाले यांच्यामध्ये पुन्हा असे कॉंक्रिटीकरण होऊ नये यासाठी महापालिका आयुक्तांनी काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे. कॉंक्रिटीकरणाचे दुष्परिणाम पावसाचे पाणी जमिनीत न मुरता थेट नदीला जाऊन मिळते. नदीच्या पूर पातळीत थोड्या पावसानेही वाढ होते. सिमेंट कॉंक्रिटीकरणामुळे शहराच्या तापमानात वाढ होते. नाल्याच्या भागातील पशु-पक्षी, झाडे यांचा अधिवास धोक्यात आला आहे. नैसर्गिक नाल्याचे फायदे नाल्यातील पावसाळी पाणी वाहून जाताना जमिनीत मुरल्यास आजूबाजूच्या परिसरात भूजल पातळी वाढून बोरवेलच्या पाण्यात वाढ होऊन पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल. नदीच्या पूर पातळीत वाढ होणार नाही. नाल्याच्या परिसरात झाडे जमिनीत ओलावा असल्याने चांगल्या प्रकारे जगतील आणि पशू पक्षी यांना त्यांचा हक्काचा अधिवास मिळेल. परिसरात ओलावा आणि झाडाची वाढ झाल्याने तसेच सिमेंट कॉंक्रिट कमी झाल्याने तापमान नियंत्रण होईल. या पावसाळी नाल्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या विविध प्रकारच्या प्रयोगानुसार रिचार्ज पिट करण्यात आल्यास मोठ्या प्रमाणात भूजल पातळी वाढेल.