चहा पावडर, मसाल्यावर बंदी : 6 लाख रुपयांचा साठाही केला जप्त पुणे – चहा पावडर, टी मसाला तसेच साखरेच्या पॅकबंद पाकिटावर कोणत्याही प्रकारचे लेबल नसल्यामुळे शहरातील येवले चहा मसाले आणि चहा पावडर उत्पादनावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) ही कारवाई करण्यात आली आहे. सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार, रमाकांत कुलकर्णी यांनी कोंढव्यातील वेळेकर नगर येथील येवले चहाच्या प्रिमिक्स बनविणाऱ्या येवले फूड प्रॉडक्टसची तपासणी केली. त्यावेळी चहा पावडर, टी मसाला तसेच साखरेच्या पॅकबंद पाकिटावर कोणत्याही प्रकारचे लेबल नसल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्याकडून करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने आणि अन्य त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली असून त्याठिकाणाहून सहा लाख रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. या तपासणीत विक्रीसाठी तयार केलेल्या प्रत्येक पाकिटावर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत आवश्यक ती माहिती असलेले लेबल लावणे आवश्यक व बंधनकारक आहे. मात्र, येवले चहाच्यावतीने कोणत्याही प्रकारचे लेबल नसल्याने त्यात नक्की कोणता अन्न पदार्थ आहे. तसेच निश्चित कोणता घटक पदार्थ किती प्रमाणात आहे, याची सर्वसामान्यांना माहिती होत नाही. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चा उद्देश साध्य होण्यासाठी संबंधित संस्थेने उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी योग्य ती शैक्षणिक आर्हता असलेल्या तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करणे गरजेचे होते. मात्र, त्या व्यक्तीची नियुक्ती केली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उत्पादन तसेच विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत,’ अशी माहिती एफडीएचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली.दरम्यान, येवले चहा पिल्यावर पित्त होत नाही. येवले चहासाठी मिनरल वॉटरचा उपयोग करण्यात येतो, अशाप्रकारची दिशाभूल करणारी जाहिरात येवले चहाकडून करूण्यात आली. कायद्यांतर्गत तरतुदीचे उल्लंघन करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल येवले चहा कंपनीला सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी नोटीस बजावली तपासणीमध्ये काय आढळले? येवले चहाच्या वतीने चहा पावडरची गुणवत्ता खातरजमा होण्यासाठी आरोग्य प्रयोगशाळेकडून तपासणी केलेली नाही. तसेच गोदामात पेस्ट कंट्रोल केले नसल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे तसेच अन्नपदार्थ पॅकिंग करण्यासाठी उपयोगात आणले जाणारे असे कोणतेही पॅकिंगचा पुरावा नव्हता. या संदर्भात हे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येवले फूड प्रॉडक्टचे उत्पादित पदार्थांची विक्री अन्वी डिस्ट्रीब्युटर्स यांच्या मार्फत करण्यात येते. त्या वितरकाकडे एफडीएचा परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे ही कारवाई केल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.