FD vs RD : फिक्स्ड की रिकरिंग… कुठे मिळतो जास्त परतावा? 5 मुद्द्यांत समजून घ्या संपूर्ण गणित
FD vs RD : FD आणि RDमध्ये काय फरक आहे? 6.5% व्याजदरावर 5 वर्षांच्या गुंतवणुकीत किती परतावा मिळतो, हे सोप्या गणितातून जाणून घ्या.

FD vs RD : बँकांमध्ये सुरक्षित गुंतवणुकीसाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि रिकरिंग डिपॉझिट (RD) हे लोकप्रिय पर्याय आहेत. FDमध्ये एकरकमी रक्कम ठरावीक कालावधीसाठी गुंतवली जाते, तर RDमध्ये दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा केली जाते.
दोन्हींचा व्याजदर समान असला, तरी मिळणाऱ्या परताव्यात फरक का पडतो, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
1. FD आणि RDमध्ये पैसे कसे जमा होतात?
FDमध्ये एकरकमी मोठी रक्कम बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ठरावीक कालावधीसाठी जमा केली जाते. FDचा कालावधी किमान 7 दिवसांपासून कमाल 10 वर्षांपर्यंत असू शकतो. गुंतवलेली संपूर्ण रक्कम सुरुवातीपासूनच खात्यात असल्याने त्यावर पहिल्या दिवसापासून व्याज मिळते.
RDमध्ये दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा केली जाते. त्यामुळे संपूर्ण रकमेवर सुरुवातीपासून व्याज मिळत नाही.
2. व्याजाची गणना कशी होते?
FDमध्ये संपूर्ण रक्कम सुरुवातीपासून गुंतवलेली असल्याने त्यावर संपूर्ण कालावधीसाठी व्याज मिळते. त्यामुळे समान व्याजदर असतानाही FDचा परतावा तुलनेने अधिक असतो. RDमध्ये प्रत्येक हप्ता वेगवेगळ्या वेळी जमा होत असल्याने प्रत्येक रकमेवर मिळणाऱ्या व्याजाचा कालावधी वेगळा असतो.
3. 5 वर्षांत किती परतावा मिळू शकतो?
समजा, वार्षिक व्याजदर 6.5 टक्के आहे. अशावेळी FDमध्ये 1 लाख रुपये 5 वर्षांसाठी गुंतवल्यास मुदतपूर्तीनंतर सुमारे 1,38,042 रुपये मिळू शकतात.
दुसरीकडे, RDमध्ये दर महिन्याला 1,666 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत एकूण सुमारे 1 लाख रुपये जमा होतील. या गुंतवणुकीचे अंदाजे मूल्य 1,18,270 रुपये होऊ शकते.
म्हणजेच, या उदाहरणात FDमधून RDच्या तुलनेत सुमारे 19,772 रुपये अधिक मिळू शकतात.
4. तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य?
तुमच्याकडे एकरकमी रक्कम उपलब्ध असेल आणि ती काही काळासाठी वापरण्याची गरज नसेल, तर FD हा पर्याय विचारात घेता येतो. मात्र, मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवणे शक्य नसेल, तर RDच्या माध्यमातून दर महिन्याला बचत करून भविष्यासाठी निधी तयार करता येतो.
5. कराच्या बाबतीत काय?
FD आणि RDमधून मिळणारे व्याज कराच्या कक्षेत येते. तसेच, व्याजाची रक्कम लागू मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास बँकेकडून TDS कापला जाऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना मिळणाऱ्या व्याजासोबत कराचा परिणामही लक्षात घेणे आवश्यक आहे.





