Fawad Khan | Pakistan : मंगळवारी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधील बैसारन मेदानावर दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकासह 26 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील हा सर्वात भीषण हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत, गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत, पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे पूर्णपणे थांबवत नाही तोपर्यंत 1960 चा सिंधू जल करार निलंबित ठेवण्याचा आणि अटारी चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशातच आता पाकिस्तानी सेलिब्रिटींना केंद्र सरकारनं जोरदार झटका दिला आहे. पाकिस्तानी अभिनेता ‘फव्वाद खान’ याचा आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ सिनेमावर भारतात बंदी घातल्याची माहिती मिळत आहे. माहिती-प्रसारण मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा अबीर गुलाल रोखल्याची माहिती समोर येत आहे. हा सिनेमा येत्या 9 मे रोजी रिलीज केला जाणार होता. या सिनेमात फवाद खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर स्क्रिन शेअर करणार होती. पण, आता सिनेमावरच बंदी घालण्यात आल्यामुळे फवाद खानसोबतच इतरही पाकिस्तानी सेलिब्रिटींसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. फवाद खानची पहलगाम हल्ल्यावर पोस्ट, म्हणाला… बॉलिवूड डेब्यू केलेला पाकिस्तानी अभिनेता फवाद खाननं लिहिलंय की, “पहलगाममधील भयानक हल्ल्याच्या बातमीनं दुःख झालं. या भयानक घटनेतील बळींसोबत आमचे विचार आणि प्रार्थना आहेत. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबाला शक्ती आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो.” अशी पोस्ट अभिनेत्याने केली आहे. पर्यटकांनी जम्मू-काश्मीरकडे फिरवली पाठ ! पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा पर्यटन उद्योगावर खोलवर परिणाम झाला आहे. हल्ल्यानंतर लगेचच पर्यटकांनी त्यांचे ९० टक्के बुकिंग रद्द केल्याचे राजधानीतील बहुतेक टूर आणि ट्रॅव्हल एजन्सींचे म्हणणे आहे. हीच पद्धत अशीच सुरू राहील अशी भीती आहे. येत्या काही दिवसांत आणखी बुकिंग रद्द होऊ शकतात. नवीन बुकिंगसाठीही कोणतीही चौकशी नाही. त्याचबरोबर, दहशतवादी हल्ला हा परदेशी पर्यटकांसाठीही चिंतेचा विषय बनला आहे. परदेशी पर्यटक टूर ऑपरेटर्सकडे सतत चौकशी करत असतात. अनेक परदेशी पर्यटकांनी काश्मीरमध्ये त्यांचे बुकिंग रद्द केले आहे.