मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाची वडिलांकडून हत्या; तुकडे करून फेकले नदीत

खांडवा – मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचे तुकडे करून नदीत फेकले. पीटीआयच्या वृत्तानुसार, पीडितेच्या वडिलांनी आणि मामाने बलात्काराच्या आरोपीची हत्या केली.
पोलीस अधिकारी विवेक सिंह यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा मुख्यालयापासून नदीचे अंतर सुमारे 40 किलोमीटर आहे. सोशल मीडियावर तरंगणाऱ्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृताची ओळख पटली असून हा मृतदेह मध्य प्रदेशातील सक्तापूर येथील 55 वर्षीय त्रिलोकचंद यांचा होता.
उपविभागीय अधिकारी राकेश पांड्रो यांनी सांगितले की, मयत हा १४ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोप होता. शनिवारी पीडितेचे वडील आणि मामा त्याला मोटारसायकलवर बसवून अजनाल नदीच्या दिशेने घेऊन गेले होते. त्यानंतर मासे कापण्याच्या हत्याराने त्रिलोकचंदची हत्या करून मृतदेहाचे तुकडे नदीत फेकण्यात आले.
या हत्येतील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणात इतरांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यांनी सांगितले की, मयत आणि आरोपी दोघेही नातेवाईक आहेत.

