Pimpri-Chinchwad : पदवीधर, शिक्षक आमदारांचे भवितव्य मतपेटीत बंद; शहरात १८ केंद्रावर मतदान
Pimpri-Chinchwad : मंगळवारी मतमोजणी

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड, पिंपळे गुरव, भोसरीतील लांडेवाडी आणि मोशी येथील एकूण १८ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. शुक्रवारी (दि. २३) सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान झाले.
पदवीधर मतदारसंघासाठी ४६, तर शिक्षक मतदारसंघासाठी ३० उमेदवार रिंगणात होते. मतपत्रिकेवर उमेदवारांना पसंतीक्रम कसा द्यायचा? पहिल्या पसंतीनंतर पुढील क्रमांक देणे आवश्यक आहे का? अशा प्रश्नांवरून मतदारांमध्ये गोंधळ झाल्याचे पाहयला मिळाले.
मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी काही मतदारांना मतदानपद्धती आणि केंद्रावरील सूचनांची माहिती समजून घ्यावी लागली. नेहमीच्या निवडणुकांतील मतदानापेक्षा पसंतीक्रमाने मतदान करण्याची पद्धत वेगळी असल्याने काही मतदारांचा गोंधळ झाला.
उमेदवाराच्या नावापुढे पसंती कशी नोंदवायची, एकाच उमेदवाराला पसंती दिल्यास चालेल का, पुढील पसंतीक्रम किती उमेदवारांना देता येतात, याबाबत मतदारांकडून विचारणा होत होती. पसंतीक्रम नोंदविताना चूक होऊन मत अवैध ठरू नये, यासाठी मतदानापूर्वी पद्धत समजून घेण्याकडे त्यांचा कल होता. पहिली पसंती निश्चित असली, तरी दुसरी आणि त्यापुढील पसंती नोंदविण्याबाबत संभ्रम होता. त्यामुळे उमेदवारांच्या निवडीबरोबरच मतदानाची पद्धतही केंद्रांवरील चर्चेचा विषय ठरली.
दरम्यान, मतदान केंद्रावरील मोबाइल बंदीमुळे मतदारांना वेगळ्याच अडचणीला सामोरे जावे लागले. मोबाइल सोबत आणल्यानंतर तो केंद्रात नेता येणार का, बंद करून जवळ ठेवता येईल का, बाहेर ठेवायचा असल्यास व्यवस्था कुठे आहे, अशा प्रश्नांबाबत संभ्रम निर्माण झाला.
विशेषतः मतदानासाठी एकटेच आलेल्या मतदारांसमोर हा प्रश्न होता. मतदानासाठी आवश्यक ओळखपत्रासोबत दैनंदिन वापरातील मोबाईलही अनेक जण जवळ बाळगतात. त्यामुळे केंद्रावर आल्यानंतर बंदीची सूचना समजल्यावर अनेकांची गैरसोय झाली.
मंगळवारी मतमोजणी
शहरात पदवीधर मतदारसंघासाठी सात हजार २८१, तर शिक्षक मतदारसंघासाठी दोन हजार ९४ नोंदणीकृत मतदार आहेत. पदवीधरसाठी १३ आणि शिक्षक मतदारसंघासाठी पाच मतदान केंद्रे होती.
मतदान प्रक्रियेसाठी १०१ कर्मचारी आणि १८ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. २७) होणार आहे.





