शहापूर : राज्यात सध्या पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे. कसारा घाटात असाच एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण ठार झाले असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. नाशिककडून मुंबईच्या दिशेने येणारा कंटेनर दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. काय घडले नेमके? हाती आलेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील नव्या कसारा घाटात कंटेनर दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. चालकाचा ताबा सुटून कंटेनर कसारा घाटात खोल दरीत कोसळला. या कंटेनरमध्ये पाच ते सहा प्रवासी होते. यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही. तर जखमींमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना बाहेर काढण्यात यश आलं आहे. नव्या कसारा घाटात बलगर पॉइंट जवळ कंटेनरचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना बाहेर काढून कसारा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस पोचले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.