MNS Mira Road Attack : मिरा रोड पूर्वेतील रामदेव पार्क परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी स्वप्निल तपासे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास तपासे हे आपल्या सहकाऱ्यांसह रामदेव पार्क येथील भाजी मंडईसमोरील सुरू असलेल्या खोदकामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी ते व्हिडिओ शूट करत असताना रावण ठाकूर हा तेथे आला आणि त्यांच्याशी वाद घालत धमकावू लागला. वाद चिघळल्यानंतर आरोपीने दगड फेकून तपासे यांच्या कानावर मारला, ज्यामुळे ते जखमी झाले. त्यानंतर नवीनसिंह ठाकूर, कृष्णा सिंह, गोलू सिंह आणि इतर काही अनोळखी व्यक्तींनी लाकडी दांडके, लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. तक्रारीनुसार, आरोपींकडे चाकूही होता. या हल्ल्यात तपासे जखमी झाले असून त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनाही धमकावण्यात आले. घटनेनंतर पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे मिरा रोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची चर्चा आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हेही वाचा : Sreeleela controversy: मासिक पाळी ‘बहाणा नाही’ म्हणणाऱ्या श्रीलीलावर टीकेची झोड; सोशल मीडियावर संताप