Pune Accident News : वडगाव ब्रिजजवळ भीषण अपघात! स्विफ्टची बसला जोरदार धडक; दोघांचा मृत्यू, चारजण जखमी

पुणेः शनिवारी पहाटेच्या सुमारास वडगाव ब्रिजच्याजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला असून चार जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. थांबलेल्या बसला स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याने ही अपघाताची घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बाह्यवळण मार्गावर वडगाव ब्रिज जवळ थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला या कारमधील तरुण गेले होते. वाढदिवसाची पार्टी करून ते येत असताना हा भीषण अपघात झाला. या कारमध्ये सहा जण होते. त्यामधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
शनिवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिज जवळ थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. स्विफ्ट कारमधील चालक दारू प्यायला होता की डुलकी लागली, याबाबत पोलीस तपास करत आहेत. या भीषण अपघाताची घटना घडताच स्थानिक कारमधील तरुणांच्या मदतीसाठी तात्काळ दाखल झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वेगाने बचावकार्य हाती घेतली.
या भीषण अपघातीच्या घटनेमुळे काही प्रश्न निर्माण होतात. चालकाने मद्य सेवन केले होते का? वाढदिवसाची पार्टी असल्याने कारमधील इतरांनी मद्याचे सेवन केले होते का? चालकाचा डोळा लागला होता का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या अपघाताच्या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत.





