चार दिवसांपासून पावसात भिजत उपोषण; …अखेर सत्ताधाऱ्यांना आली जाग

पिंपरी – पिंपळे निलख येथील पवना नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाणी प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर रयत विद्यार्थी परिषदेचे दोन विद्यार्थी आमरण उपोषणासाठी बसले होते. ऊन, वारा, पावसाची तमा न करता कोणत्याही प्रकारचा निवारा न उभारता भर पावसात उपोषण सुरू होते.
अखेर चौथ्यादिवशी (दि. 23) सत्ताधाऱ्यांना जाग आली. स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे आणि नगरसेवक शीतल शिंदे यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेत, महापालिका मुख्यालयात चर्चेला बोलविले. चार दिवसांनंतर या उपोषणकर्त्यांची दखल घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
या प्रकरणात कारवाई करण्यासंदर्भात चौकशी समिती नेमावी. दोषी असलेले अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी भेटून मागणी केली असता कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने रविराज काळे व हृषीकेश कानवटे यांनी मंगळवारपासून (दि. 20) महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वावारासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
शहरात परतीचा पाऊस दररोज दमदार हजेरी लावत आहे. या उपोषणासाठी साधा मंडपही नसलेल्या या उपोषणकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले आहे. प्लॅस्टिकचा एक साधा बॅनर या उपोषणाची माहिती देत आहे; तर प्लॅस्टिकचा तुकडा बसायला घेतलेले हे उपोषणकर्ते पावसाचा जोरदार मारा निधड्या छातीवर झेलत आहेत. रात्रीदेखील एक साधे ब्लॅंकेट घेऊन हे उपोषणकर्ते झोपत आहेत.
शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास “दै. प्रभात’च्या प्रतिनिधीने उपोषणकर्त्यांची भेट घेतली असता जळजळीत सत्य समोर आले. गेली चार दिवस महापालिका अधिकारी अथवा पदाधिकारी या उपोषणकर्त्यांकडे फिरकलेदेखील नाहीत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनादेखील त्यांची दखल घ्यावीशी वाटली नाही. तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केवळ पत्रकबाजी करत, महापालिकलेची बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला.
या आहेत उपोषणकर्त्यांच्या मागण्या…
– पिंपळे निलख येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम ठेकेदाराकडून काढून घ्यावे. ते महापालिकेने चालवावे
– पर्यावरण विभाग अभियंता संजय कुलकर्णी यांना निलंबित करावे
– याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
– मेसर्स विनय इंजिनिअरिंग प्रा. लि. या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे.
– पिंपळे निलख जलशुद्धीकरण केंद्रात असणारी बायपासची लाइन पूर्णपणे उखडून टाकावी.
आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
उपोषणकर्ते युवक, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, नगरसेवक शीतल शिंदे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यात शुक्रवारी मुख्यालयात चर्चा झाली. उपोषणकर्त्यांच्या पाच मागण्यांनपैकी तीन मागण्या मान्य तर दोन मागण्यांची चौकशी करू असे लेखी आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.





