Pune Rural News : बकोरी रस्त्यांच्याबाबत प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

वाघोली : बकोरी रोडच्या समस्येबाबत मागील पाच दिवसांपासून बकोरी फाटा येथे टीम वाकोच्या वतीने सुरू असलेले आमरण उपोषण आंदोलन सोडले. पीएमआरडीए व पीएमसीच्या वतीने मागण्यांचे लेखी उत्तर मिळाल्यानंतर उपोषणकर्ते अनिलकुमार मिश्रा यांनी बकोरी रोडवर अपघातग्रस्त झालेली वृद्ध व्यक्ती, पोलीस निरीक्षक युवराज हांडे व उपस्थितांच्या हस्ते ज्यूस पिऊन पाचव्या दिवशी सायंकाळी उशिरा उपोषण सोडले. यावेळी उपस्थित नागरिकांनी जल्लोष केला, फटाके उडवून व नाचून आनंद व्यक्त केला.
मागील अनेक वर्षांपासून बकोरी रोडवर प्रवास करीत असताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. प्रशासनाकडे नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करूनही या रस्त्याचा प्रश्न लागत नाही. न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या या रस्त्यामुळे प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे. या रोडसंदर्भात टीम वाको च्यावतीने आमरण उपोषण आंदोलन १३ सप्टेंबर पासून सुरु करण्यात आले होते.
अनिलकुमार मिश्रा यांनी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर बकोरी रोडवरील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. उपोषणाच्या चौथ्या दिवशी पीएमआरडीए आणि पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पीएमआरडीएच्या वतीने सदरचा रोड महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला तर बिल्डरला रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत नोटीस काढण्यात आली. पीएमसीने दिलेल्या लेखी पत्रामध्ये दोन महिन्यात डीपीआर, निधी उपलब्ध तीन महिन्यात कामाला सुरुवात, न्यायालयीन दावे निकाली लागल्यावर तसेच भूसंपादन झाल्यानंतर रस्ता एक वर्षात करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. रस्त्यासाठी आवश्यक जागा पीएमआरडीए एफएसआय/टीडीआर च्या माध्यमातून उपलब्ध करून देऊन पीएमसी रस्ता करणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची तत्परता..
टीम वाकोचे उपोषणकर्ते अनिलकुमार मिश्रा यांचे चौथ्या दिवशी आंदोलन सुरु असल्याने विविध पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विचारपूस केली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता.
शिवसेनेच्या महिला पदाधिकारी डॉ. सारिका पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी मिश्रा यांचा फोनद्वारे संपर्क संवाद घडवून आणला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत मार्ग काढणार असल्याचे कळविले. पीएमसी, पीएमआरडीए अधिकारी यांच्याशी चर्चा करून याबाबत लवकर कार्यवाही करणार असल्याचे आश्वासित केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रशांत जगताप यांनी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून लेखी उत्तर देण्याबाबत कळविले. विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला पाठींबा दिला होता.




