विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून स्वातंत्र्यदिनी देशभरात काढण्यात येणार ट्रॅक्टर मोर्चा

नवी दिल्ली : विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) देशभरात ट्रॅक्टर मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी आंदोलनाचा भाग म्हणून केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या पुतळ्यांचे दहन १ ऑगस्टला केले जाणार आहे. केंद्र सरकारने शेतमालासाठी किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी द्यावी, अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
त्या आणि इतर मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारीला दिल्ली चलो आंदोलन सुरू केले. मात्र, त्यांना हरियाणा पोलिसांनी सीमेवर रोखले. शेतकऱ्यांनी पुढे कूच करू नये यासाठी अंबाला-नवी दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर बॅरिकेडस् उभारण्यात आले. तेव्हापासून आंदोलक शेतकरी शंभू आणि खनौरी सीमांवर मुक्काम ठोकून आहेत.
दिल्लीच्या दिशेने कूच करण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. त्यांच्या आंदोलनाला ३१ ऑगस्टला २०० दिवसांचा कालावधी पूर्ण होईल. त्यामुळे अधिकाधिक संख्येने शेतकऱ्यांना संबंधित सीमांवर पोहचण्याचे आवाहन आंदोलकांनी केले आहे. आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा त्यांचा इरादा आहे. त्यासाठी १ ऑगस्टला देशभरात जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी एकत्र येऊन शेतकरी भाजपच्या पुतळ्यांचे दहन करणार आहेत.





