Shaktipeeth Expressway : शेतकरी शक्तिपीठ महामार्गाविरुद्ध आझाद मैदानावर काढणार मोर्चा; कोल्हापूरच्या बैठकीत झाला निर्णय

कोल्हापूर : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तिपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत हाणून पाडणार, तसेच शक्तिपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला 12 जिल्ह्यांतील शेतक-यांचा आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा निर्धार कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग कृति समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
दरम्यान, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शाहू स्मारक भवन येथे शक्तिपीठ महामार्गविरोधी कृति समितीच्या वतीने बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आमची इंचभरही जमीन देणार नाही, वाडवडिलांकडून वारसा हक्काने आलेली जमीन सोडणार नाही, पिकाऊ शेतजमीन ही आमची भूमी आई आहे, अशी शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सूतोवाच केले होते. महामार्गासाठी जमीन संपादनाचे काम सुरू केले आहे; मात्र हा विकासाचा मार्ग नसून शेतक-यांना देशोधडीला लावणारा मार्ग आहे. हा मार्ग अंबानी, अदानी यांचा विकास करणारा मार्ग आहे. ७६ हजार कोटींचा हा प्रकल्प कोणाच्या विकासाचा आहे.
शेतकऱ्यांचे हित दिसत नाही ठेकेदारांचे हित दिसते. त्यामुळे हा मार्ग कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी भूमिका उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी मांडली. काही वर्षांपूर्वी आमच्या शेतीला पाणी मिळत नव्हते, कोरडवाहू जमिनीमुळे आमची हालअपेष्टा झाली. आता शेतीला पाणी मिळाले आहे, उत्तम प्रकारे पीक येऊ लागले आहे आणि चांगल्या कसदार जमिनी रस्ते प्रकल्पाच्या नावाखाली काढून घेतल्या जात आहेत हे आम्ही कदापि सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीत हा मार्ग उखडून टाकू, अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.





