शेतीला कृषी पर्यटनाची जोड दिल्यास शेतकरी समृद्ध होईल: अभिनेते मिलिंद शिंदे

पुणे: “अवकाळी पाऊस, बदलती शासकीय धोरणे आणि पर्यावरणीय बदलांमुळे शेती अनिश्चित झाली आहे. शेतकऱ्यांच्या हाती अनेकदा निराशाच येते. मात्र, शेतीला कृषी पर्यटनाची जोड दिल्यास शेतकरी समृद्ध होऊ शकतो. महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी यशस्वी प्रयोग केल्याचे पाहून आनंद होतो,” असे मत अभिनेते मिलिंद शिंदे यांनी व्यक्त केले. परभन्ना फाउंडेशन, कृषी पर्यटन विश्व आणि धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठान आयोजित जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त ‘महाराष्ट्र कृषी पर्यटन परिसंवाद २०२५’ मध्ये ते बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ‘शासकीय धोरणे आणि कृषी पर्यटनाचा विकास’ या विषयावर चर्चा झाली. शिंदे यांच्यासह डॉ. मीनाक्षी पाटील, जिल्हा पर्यटन अधिकारी अजिंक्य लुगडे, कृषिराज पिलाणे यांनी विचार मांडले. परभन्ना फाउंडेशनचे गणेश चप्पलवार, पंकज चव्हाण, व्यंकटेश कल्याणकर, सारंग मोकाटे, सूर्यकांत पोतुलवार, अजित मांदळे, महेश गोरे, सुप्रिया थोरात उपस्थित होते.
वल्लरी प्रकाशनाचे ‘कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन झाले. तसेच सुरेश मराठे, मंगल भिंगारे, अजय मिठारे, बन्सी तांबे, डॉ. अमोल पुंडे, अनिल मगर, मानसिंगराव जगदाळे, युवराज सांडभोर, सरस्वती हेंद्रे, धनश्री गायकवाड यांना ‘कृषी पर्यटन उद्योजकता पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले.
डॉ. मीनाक्षी पाटील म्हणाल्या, “उपलब्ध साधनांचा उपयोग करून शेतीला पूरक व्यवसाय उभारण्याचा विचार व्हावा. शासकीय योजनांचा लाभ घेऊन कृषी पर्यटन उद्योजक वाढवावेत.” गणेश चप्पलवार यांनी कृषी पर्यटनाने देशाला दिशा दिल्याचे नमूद केले. व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविक, प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन, तर पंकज चव्हाण यांनी आभार मानले.





