Satara News | शेतकऱ्यांना एक रुपयात मिळणार पीक विमा

सातारा, – नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इत्यादी कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास एक रुपया भरुन शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने रब्बी हंगामसाठी पंतप्रधान फसल बीमा योजना सुरु केली आहे. यावर्षी आजअखेर ७ हजार २६९ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दि. ३० नोव्हेंबरपर्यंत पीक विमा घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनाला अनेकदा विविध कारणास्तव फटका बसत असतो. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी केंद्र शासनाने पीक विमा योजना सुरू केली आहे. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागत होती. राज्य आणि केंद्र शासनाचाही वाटा असायचा. शासनाने खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीही एक रुपयात पीक विमा देण्याची योजना सुरु आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी या योजनेसाठी सुमारे पावणेतीन लाखांहून अधिक अर्ज आले होते. माण तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग होता. त्यातच गेल्या वर्षी दुष्काळ पडल्याने लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली. यावर्षी ७ हजार २६९ शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय, महसूल मंडलनिहाय पिके व क्षेत्र यासाठी अधिसूचित केली आहेत. त्याप्रमाणे ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी ही योजना लागू आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी सातबारा उतारा, खाते उतारा, सात बारा उताऱ्यावर पिकाची नोंद नसल्यास पीक पेऱ्याचे स्वयंघोषणापत्र, बॅंक पासबुक, फोटो ओळखपत्र (आधारकार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड आदी) आवश्यक आहे. विमा हप्ता राष्ट्रीयीकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सार्वजनिक सुविधा केंद्र, पोस्ट कार्यालय, विमा कंपनी प्रतिनिधींकडे भरता येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दि. ३० नोव्हेंबरपर्यंत पीक विमा काढावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार संरक्षित रक्कम
केंद्र शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना आता एक रुपयात पीक विमा मिळत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे विविध कारणास्तव नुकसान झाल्यास हेक्टरी संरक्षित मदत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये रब्बी ज्वारीस हेक्टरी २६ हजार रुपये, रब्बी ज्वारी जिराइत हेक्टरी २० हजार रुपये, गहू हेक्टरी ३० हजार रुपये, हरभरा हेक्टरी १९ हजार रुपये, रब्बी कांदा हेक्टरी ४६ हजार रुपये, उन्हाळी भुइमुगास हेक्टरी ४० हजार रुपये संरक्षित रक्कम आहे.
तालुकानिहाय संरक्षित पिके
सातारा – ज्वारी बागायती व जिरायती, गहू, भुईमूग. कोरेगाव – ज्वारी बागायती व जिरायती, गहू, हरभरा, कांदा, भुईमूग. खटाव – ज्वारी बागायती व जिरायती, गहू, हरभरा, कांदा, भुईमूग. कराड – ज्वारी जिरायती, गहू, भुईमूग. पाटण – ज्वारी जिरायती, गहू, भुईमूग. वाई – ज्वारी बागायती व जिरायती, गहू, हरभरा, भुईमूग. जावळी – ज्वारी बागायती व जिरायती, गहू. महाबळेश्वर – ज्वारी बागायती व जिरायती, गहू. खंडाळा – ज्वारी बागायती व जिरायती, गहू, कांदा, भुईमूग. फलटण – ज्वारी बागायती व जिरायती, गहू, कांदा, भुईमूग. माण – ज्वारी जिरायती, गहू, कांदा, भुईमूग.





