Satara | शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देण्याचे काम करत राहणार

सातारा, (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि बाराबलुतेदारांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम आमदारकीच्या माध्यमातून करणार असल्याचे आ. सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले. वाढे फाटा, सातारा येथे सत्काराप्रसंगी आ. खोत बोलत होते. यावेळी रयत क्रांतीचे युवक जिल्हाध्यक्ष सोनू साबळे यांनी सातारा कंदी पेढ्याचा हार घालून आ. खोत यांचे स्वागत केले.
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत यांची पुन्हा एकदा विधान परिषद आमदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच साताऱ्यात आले होते. आ. सदाभाऊ खोत म्हणाले, आजपर्यंत गावगाड्यातील कष्टकरी, शेतकरी जनतेचे प्रश्न चळवळीच्या माध्यमातून मांडत आलो आहे.
बारा बलूतेदार समाजाला न्याय देण्याचे काम या चळवळीतून तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महायुतीच्या माध्यमातून करत आलो आहे आणि ते कार्य पुढेही असेच सुरू ठेवणार आहे. पुन्हा एकदा आमदार झाल्यामुळे शेतकऱ्यांना कशाप्रकारे सर्व सुविधा त्यांच्या बांधावरती मिळतील यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
या सरकारने शेतकऱ्यांचे ४६ हजार कोटी रुपयांचे शेती पंपाचे बिल माफ केले आहे. इथून पुढे शेतकऱ्याला साडेसात एचपी पर्यंतच्या शेतीपंपाचे वीज बिल येणार नाही. शेतीपंपासाठी मागेल त्याला सौरऊर्जा कनेक्शन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दूधासाठी तसेच दुधाच्या भुकटीच्या निर्यात सुरु करण्याचे काम महायुती सरकारने केले. शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय या सरकारच्या काळात झाले आहेत.
यावेळी सातारा येथे महायुतीच्या माध्यमातून भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी रयतचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, युवा नेते अरुण कदम, राहुल पवार, युवराज नाना नलवडे, संजय साबळे, निलेश शिंदे, गिरीश आवळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.





