Pimpri : नगररचना योजनेला शेतकऱ्यांचा ठाम विरोध

चांदखेड : नेरे, सांगवडे, दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, धामणे या गावांमध्ये पीएमआरडीएने प्रस्तावित केलेली नगररचना योजना आणि नेरे ते उरसे दरम्यानच्या ६५ मीटर रिंग रोड या दोन्ही योजना अन्यायकारक असल्याचा ठाम पवित्रा घेत शेतकऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयाला भेट दिली. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
बैठकीला पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे, नगररचना संचालक अविनाश पाटील, सहसंचालक श्वेता पाटील उपस्थित होते. शेतकरी बांधवांच्या वतीने बोलताना बाळा भेगडे म्हणाले, सदर दोन्ही प्रकल्पामुळे तब्बल २१०० एकर बागायती क्षेत्र बाधित होणार असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. या योजना कोणत्याही परिस्थितीत होऊ दिल्या जाणार नाहीत. जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाहीत, तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तसेच लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतकरी प्रतिनिधींची बैठक आयोजित करून या विषयावर ठोस निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही भेगडे यांनी दिली.





