निरा डावा कालवा अस्तरीकरणाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; ठेकेदाराने काम थांबवले

काटेवाडी – काटेवाडी (ता. बारामती) परिसरातील मासाळवाडी येथे निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध करत रविवारी (दि. ५) सकाळी काम थांबवले. ठेकेदाराने शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता काम सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी उसळली. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात बदल होऊन पिण्याच्या पाण्याची टंचाई व शेतीला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली.
मासाळवाडी भागात कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू असताना, स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी एकत्रित झाले. त्यांनी ठेकेदाराला काम तात्काळ थांबविण्याचा इशारा दिला आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढील कामाला परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. या आक्रमक भूमिकेमुळे ठेकेदाराच्या सुपरवायझरने काम बंद करण्याचा निर्णय घेतला.
“अस्तरीकरणामुळे कालव्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित होईल, ज्यामुळे भागातील विहिरी, कूपनलिका व शेतजमिनींना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल,” असे शेतकऱ्यांनी सांगितले.
ठेकेदाराने पुन्हा काम सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासो शिंदे, ग्रामपंचायतीचे सदस्य अजित काटे, सागर मासाळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष हरिश्चंद्र मासाळ, रणजित गायकवाड, बलभीम मासाळ, संपतराव मासाळ, राहुल ठोंबरे, सोमनाथ मासाळ, अनिल निगडे, बंटी मासाळ यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आता विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे.





