ठाणे : बदललेल्या वातावरणामुळे मान्सून प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली असल्याने मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. यामुळे 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे. ज्यामुळे यादरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. प्रामुख्याने जून महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात सर्वत्र जोरदार पाऊस येण्यास सुरुवात होते. यानंतर सर्वत्र शेतकऱ्यांकडून पेरण्या केल्या जातात. ठाणे जिल्हयात प्रामुख्याने भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जूनच्या अखेरीस सर्वत्र शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरुवात होतात. मात्र यंदा जून महिन्यात कोसळणाऱ्या पावसाने मे महिन्यातच हजेरी लावल्याने सर्वत्र वातावरणात गारवा देखील पसरला आहे तर पेरणीपूरक चित्र दिसून येत आहे. मात्र असे असले तरी हा पाऊस सलग पडणार नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.