शेतकऱ्यांना भरपाई व सरसकट कर्जमाफी मिळावी

पाटण – चालूवर्षी पावसाने कहर केल्याने पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे आतोनात नुकसान झाले असून शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या अडचणीतून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी त्याला नुकसानीची योग्य ती भरपाई मिळावी. तसेच सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी पाटण तालुका शिवसेनेच्यावतीने तालुकाध्यक्ष सुरेश पाटील यांनी तहसीलदार पाटण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार पाटण तालुक्यातील अतिवृष्टी व परतीचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट होवून अतोनात नुकसान झालेले आहे. याचे पंचनामे व सर्वेक्षण ग्रामसेवक, तलाठी यांनी केलेले आहेत. मात्र आजअखेर कोणत्याही शेतकरी बांधवास भरीव अशी नुकसान भरपाई मिळालेली नाही. केंद्र सरकारने दिलेली मदत ही भरीव स्वरूपाची नाही. मात्र ही मदत शेतकऱ्यांना वेळेवर मिळणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांचा पीकविमा, शेतकरी सन्मान योजना, शेतकरी पेन्शन योजना या सर्व योजनेपासून शेतकरी वंचित आहेत. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतील बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रती दोन हजार प्रमाणे असणारे हप्ते आजपर्यंत जमाच झालेले नाहीत. याची चौकशी करून न्याय मिळावा. सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा अशी मागणी पाटण तालुक्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांची असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा हीच मागणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची देखील आहे.
आजअखेर झालेल्या पाटण तालुक्यातील पंचनाम्याची यादी मिळावी, अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर उपजिल्हा प्रमुख रविंद्र पाटील, उपतालुका प्रमुख सचिन जाधव, तालुका संपर्क प्रमुख प्रविण शिंदे, तालुका महिला आघाडी प्रमुख अनिता वरेकर, कोयना विभाग प्रमुख लक्ष्मण कदम, उपविभाग प्रमुख सीताराम कदम, तारळे विभाग प्रमुख सचिन मोहिते, ढेबेवाडी विभाग प्रमुख पांडूरंग साळुंखे, मारूल व मोरणा विभाग प्रमुख तुकाराम सुर्वे, पाटण शहर प्रमुख शंकरराव कुंभार, उपशहर प्रमुख संजय शिंदे व महादेव खैरमोडे यांच्या सह्या आहेत.





