वाई -कृषी विभागाच्या बांधावर खत अभियानाचा सर्वच गावातील शेतकरी बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून लाभ घ्यावा, जेणेकरून कृषी सेवा केंद्रावर खत, बियाणे आणि कीटकनाशके याची खरेदी होण्यासाठी होणारी गर्दी टाळून करोना संसर्ग टाळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन तहसीलदार रणजित भोसले यांनी केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, कृषी पर्यवेक्षक नितीन धुमाळ, कृषी सहायक सचिन जगताप, एम. बी. पाटील, गटाचे अध्यक्ष रामचंद्र सणस आणि सदस्य उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लागणाऱ्या निविष्ठांची मागणी शेतकरी निहाय यादी करून गटामार्फत कृषी विभागाकडे द्यावी व त्यासाठी लागणारी रक्कम गट प्रमुखाकडे जमा करावी. कृषी विभागाच्या सहकार्याने उपलब्ध असलेले खत आणि बियाणे नोंदणीकृत कृषी सेवा केंद्राकडून खरेदी करून शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतावर पोहचवता येईल. ज्या गावात गट नाही अशा गावातील शेतकऱ्यांनी नोंदणीकृत गटाच्या माध्यमातून कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात त्याकरिता त्या गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांची मदत अथवा कार्यालयाशी संपर्क साधावा. यासाठी नोंदणीकृत गटातील गटप्रमुखांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी यावेळी केले आहे.