Pimpri : भात भरडण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

नाणे मावळ : मावळ तालुका हा खरीप भात पिकासाठी व इंद्रायणी तांदूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी भात पिकाचेच उत्पादन घेतात. तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक भात लागवड होते. नाणे मावळ, पवन मावळ, आंदर मावळ या तीनही मावळ विभागात नोव्हेंबर महिन्याअखेरीस भात पिकाची काढणी जवळपास पूर्ण झाली होती. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग आता भात पिकाच्या भरडणीच्या कामाला लागले आहेत.
सध्या तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी आपल्या परिसरातील जवळील राइस मिलवर पोत्यांमध्ये भात भरुन ते भरडण्यासाठी घेऊन जात आहेत. मावळ तालुक्यात पूर्वी भात गिरण्यांची संख्या कमी होती. परंतु सद्यस्थितीत राइस मिलची संख्या मुबलक असल्याने शेतकरी भात भरडण्यासाठी किंवा थेट राइस मिलच्या ठिकाणीच भात विक्रीसाठी घाई करताना दिसत आहेत.
मावळात यंदा पर्जन्यमान चांगले राहिले. त्यामुळे भात पिकास पोषक वातावरण निर्माण होऊन भाताचे उत्पादन चांगले राहण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार यंदा भाताच्या सरासरी उत्पादनात वाढ झाली आहे. मागील वर्षी सरासरी उत्पादन प्रतिहेक्टरी ४ हजार १८२ किलोग्रॅम होते. यंदा अंदाजे हे प्रमाण ७ हजार २८० किलोग्रॅम इतके असण्याचा अंदाज आहे.
इंद्रायणी तांदूळ ही मावळची खास ओळख आहे. त्यानुसार यंदाही बाजारात मावळचा इंद्रायणी तांदूळ भाव खाण्याची शक्यता आहे. तालुक्यात इंद्रायणीसह तांदुळाच्या अन्य वानांचेही उत्पादन घेतले जाते. त्यात इंद्रायणीला दर्जानुसार प्रतिकिलो सुमारे ६० ते ७० रुपयेचा दर मिळण्याची शक्यता आहे. तर काही शेतकऱ्यांनी फुले समृध्दी, रत्नागिरी २४, कोलम व आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन घेतले असून या तांदुळांना देखील चांगला भाव मिळेल, असे शेतकरी सांगत आहेत.
इंद्रायणी तांदूळ खाणार भाव
मावळ तालुक्यात यंदा हेक्टरी उत्पादनात वाढ झाली असून नव्या तांदुळाला चांगला भाव मिळेल, अशी सध्या चर्चा आहे. सध्या तांदुळाच्या फुले समृध्दी वाणास प्रतिकिलो ५० ते ५५ रुपये, रत्नागिरी २४ वाणास प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये, कोलम वाणास प्रतिकिलो ३५ ते ४० रुपये दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर मावळची खास ओळख असलेल्या इंद्रायणी तांदुळाला यंदा विक्रमी ६० ते ७० रुपये प्रतिकिलोचा दर मिळण्याचा अंदाज आहे. सोबत आंबेमोहर वाणाचे उत्पादन कमी घेतले असल्याने या वाणाला ९० ते १०० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शेतकऱ्यांनी यांत्रिक पद्धतीने भात काढणीस प्राधान्य दिले आहे. त्यामुळे भात लवकर मिलवर येत आहे. काही व्यापारी मिलवरच येऊन शेतकऱ्यांकडून तांदळाची खरेदी करतात. मावळ तालुक्यात यंदा भात पिकाचे उत्पादन वाढले आहे. तसेच तालुक्यात यंदा पाऊस जास्त पडल्यामुळे तांदळाची मोड देखील होत असून त्यामुळे भाताचे भाव कमी झालेत. परंतु मागणी विचारात घेता पुढील दिवसात तांदळाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
– ज्ञानेश्वर कोंडे, संचालक, श्रीराम राइस मिल





