Bachchu Kadu | Devendra Fadnavis : ‘७/१२ कोरा करा. तो शेतकऱ्यांचा हक्क आहे..’ असे बच्चू कडू यांनी मागणी केली. २८ ऑक्टोबरला नागपूरची भूमी उत्तर मागेल. आता मौन नाही. उत्तर हवे. चला नागपूर, शेतक-यांचा एल्गार उठणार! असा इशाराच प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सोशल मीडियाद्वारे दिला. त्यामुळे २८ ऑक्टोबर रोजी नागपूरमधून नव्याने आंदोलन सुरू होणार असल्याचे समोर येत आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी प्रहार सरकारची डोकेदुखी वाढवणार असल्याचे समोर येत आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा ठेवणीतील शस्त्र बाहेर काढले आहेत. दिवाळीत त्यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता त्यांनी पुन्हा सरकारकडे, विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. शेतक-यांचा ७/१२ कोरा करण्यासाठी त्यांनी एल्गार पुकारला आहे. नव्याने आंदोलनाची हाक दिली आहे. यावर्षी जून महिन्यात त्यांनी सरकारच्या नाकात चांगलाच दम आणला होता. त्यावेळी अन्नत्याग आंदोलन केले होते. तर नंतर कर्जमाफीसाठी त्यांनी विदर्भ पिंजून काढला होता. अनेक जिल्ह्यात त्यांनी कर्जमाफीसाठी पदयात्रा काढली होती. यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बच्चू कडू यांनी कर्जमाफी, ७/१२ कोरा करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. ७ व्या दिवशी आंदोलन पेटल्यानंतर तातडीने सरकारने त्यांना आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर बच्चू कडू यांनी विदर्भात कर्जमाफीसाठी पदयात्रा सुद्धा काढली. या यात्रेत त्यांनी अनेक शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कर्जमाफी किती गरजेची आहे ते पटवून दिले. आता अतिवृष्टीने राज्यातील २९ जिल्ह्यातील लाखो शेतक-यांना मोठा फटका बसला. पण भरीव मदत अद्यापही शेतक-यांना मिळालेली नाही. तर सरकारला कर्जमाफीचा विसर पडू नये यासाठी बच्चू कडू पुन्हा मैदानात उतरले आहेत. या महिन्याच्या अखेरीस ते आंदोलनाचा पुकारा करतील.