Farmer Protest – जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे दीर्घकाळ थकीत राहिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून हा संताप आता आंदोलनाच्या रुपात उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात दि. ९ मेपर्यंत व्याजासह थकीत रक्कम जमा न झाल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सातारा दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात येईल, असा इशारा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना किसान मंचचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष शंकर गोडसे यांनी दिला आहे. किसन वीर, प्रतापगड तसेच अजिंक्यतारा साखर कारखान्यांकडून उस उत्पादक शेतकऱ्यांचे मागील सहा महिन्यांपासून पैसे थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेषतः किसन वीर साखर कारखान्याला शासनाकडून उर्जितावस्थेसाठी मोठा निधी मिळाल्यानंतरही शेतकरी व कामगारांना कोणतीही देयके न दिल्यामुळे प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या परिस्थितीमुळे हजारो शेतकरी कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली असून त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी संघटनेच्या मते, एफआरपी नियमानुसार उस तोडल्यानंतर १४ दिवसांत पैसे देणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास १५ टक्के व्याजासह रक्कम देणे आवशेतकरी आंदोलन, ऊस बिल थकबाकी, नितीन गडकरी सातारा दौरा, किसन वीर साखर कारखाना,श्यक असते. मात्र, प्रत्यक्षात हे नियम धाब्यावर बसवले जात असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. कारखाने साखर विक्रीतून नफा कमावत असताना शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र रक्कम जमा होत नसल्याची खंत गोडसे यांनी व्यक्त केली. दरम्यान, उसाचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर मोठा परिणाम होत आहे. मुलांची लग्ने रखडणे, शेतीसाठी पुढील गुंतवणूक थांबणे आणि बँकांच्या कर्जाचा वाढता बोजा या समस्यांनी शेतकरी हतबल झाले आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या १. उसाचे थकीत पैसे तातडीने अदा करावेत २. विलंबित रकमेवर १५% व्याज द्यावे ३. एफआरपी नियमांची कठोर अंमलबजावणी करावी ४. कारखाना व्यवस्थापनावर कारवाई करावी ५. शेतकरी व कामगारांना आर्थिक दिलासा द्यावा