Farmers Protest – घोडधरणातून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या १२३४ कोटी रुपयांच्या साकळाई उपसा सिंचन योजनेवरून शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या योजनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील ४२ गावांना पाणी मिळणार असले, तरी घोडनदी काठच्या स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीवर आणि पिण्याच्या पाण्यावर गदा येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत घोडधरण बचाव शेतकरी कृती समिती स्थापन केली असून, इनामगाव येथे निषेध सभा घेऊन या योजनेला तीव्र विरोध दर्शवला आहे. साकळाई योजनेतंर्गत घोडधरणातील १.८० टीएमसी पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे उपसा करून नेले जाणार आहे. मात्र, सध्या उन्हाळ्यातच घोडनदी कोरडी पडली असताना नवीन योजना राबवणे अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सोमवारी (दि. २०) आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या पाणी टंचाई निवारण बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून या योजनेला विरोध करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. इनामगाव : येथे निषेध सभा घेऊन या योजनेला तीव्र विरोध दर्शवला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे ही योजना मंजूर झाली असली, तरी स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी हा लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. धोडधरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक नसताना ही नवीन योजना लादली जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला पाणी मिळण्यास आमचा विरोध नाही. परंतु त्यासाठी विसापूर धरण हा पर्याय उपलब्ध असताना घोडधरणावर अन्याय का? पूर्वी मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी एमआयडीसीच्या पाण्यास विरोध करण्यास सांगितले होते आणि आता त्यांचेच सुपुत्र ही योजना आणत आहेत, हा मोठा विरोधाभास आहे. आम्ही या अन्यायकारक योजनेला शेवटपर्यंत विरोध करू. – श्रीनिवास घाडगे, संचालक, श्रीगोंदा स. सा. कारखाना शासकीय स्तरावर धरणात पाणी शिल्लक राहत असल्याचा चुकीचा अहवाल तयार होण्यास आपली काही अंशी उदासीनता कारणीभूत आहे. शेतकरी पाणी मागणी अर्ज भरत नाहीत किंवा पाणीपट्टी थकवतात, ज्यामुळे कागदोपत्री पाणी शिल्लक दिसते. शेतकऱ्यांनी आता सतर्क होऊन पाणी मागणी अर्ज भरावेत आणि थकीत पाणीपट्टी भरून आपला हक्क सिद्ध करावा. हक्काचे पाणी वाचवण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आम्ही न्याय मिळवू. – बाळासाहेब घाडगे, शेतकरी संघटना