महाळुंगे इंगळे आणि परिसरात पावसाने शेतकरी हैराण : तरकारी पिकांना पावसाचा फटका महाळुंगे इंगळे – महाळुंगे इंगळे परिसरातील खराबवाडी, नाणेकरवाडी, खालुंब्रे, वाकी, बिरदवडी, येलवाडी आदी भागातील शेतकऱ्यांचा सोयाबीन पीक घेण्याकडे वाढता कल दिसत आहे. अनियमित पाऊस व निसर्गाच्या लहरी पणामुळे सोयाबीन पिकाची बऱ्यापैकी हमी वाटत असल्याचे या परिसरातील शेतकरी आवर्जून सांगत आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे कांदा, बटाटा या प्रमुख पिकासह तरकारी पिकाकडेही शेतकऱ्यांचा कल कमी झाल्याचे जाणवत आहे. किमान मुद्दल तरी सुटावी, अशी अपेक्षा या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची आहे. बऱ्याचदा शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागतो, त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी पसंत केली आहे. भुईमूग, बाजरी, उडीद या पिकांची सध्या तरी जास्त खात्री मिळत नसल्याने सोयाबीन पीक परवडत असल्याचे येथील प्रगतशील शेतकरी धोंडिभाऊ बोऱ्हाडे यांनी सांगितले. मात्र, असे असले तरी यंदाच्या सततच्या पावसाने सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला आहे. सुमारे पन्नास टक्के उत्पादन घटले आहे. त्या नुकसानीत आणखी भर पडली ती सध्याच्या परतीच्या पावसाने. काढलेले पीक वाळवता येत नसल्याने आणि काही पिके काढता येत नसल्याने अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला असून, सध्या शेतकऱ्यांना या पिकापासून होणाऱ्या नुकसानीस तोंड द्यावे लागत आहे. सोयाबिनबाबत एकरी सुमारे 25 ते 30 पोती अपेक्षित होते; परंतु यंदाच्या अनियमित पावसामुळे ते उत्पादन 12 ते 15 पोती इतक्या वरच येऊन ठेपले आहे. सततच्या आणि जादा पावसाने सोयाबिन पिकासही चांगलाच फटका बसला आहे, त्यामुळे सोयाबिन पिकातही यंदा शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडली आहे. यंदा जून महिन्यातील जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीसही फारसा वाव मिळाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनची 300 हेक्टर पेरणी कमी झाली. पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. यावर्षी 6116 हेक्टर पेरणी खेड तालुक्यात करण्यात आली आहे. – नरेंद्र वेताळ, तालुका मंडलाधिकारी, खेड