पळसदेव : शेतकर्यांनो उसाचे पाचट जळू नका. पाचट जाळणे म्हणजे 10 जन्माचे पाप या एकाच जन्मात करणे हे आहे. आपण जमिनीचा आत्माच जाळून घालवत असू तर आपल्या शेती करण्याला काहीही अर्थ राहत नाही. त्यामुळे पाचट व्यवस्थापन करावे. शेतातील पाचट न जाळता त्याची कुट्टी करून कुजवल्यास जमिनीत सेंद्रिय कर्बाची वाढ होऊन जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे शेतकर्यांनो उसाचे पाचट जळू नका, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी बोलताना व्यक्त केले. पळसदेव भागातील बांडेवाडी येथे विजयकुमार काळे यांच्या शेतात ऊस पाचट व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले होते. या वेळी तालुका कृषी अधिकारी बोलत होते. रुपनावर म्हणाले, पाचटाच्या पूर्ण आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणार्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. शेतात ओलाव्याचे प्रमाण दीर्घकाळ (15 ते 20 दिवस) टिकून राहते. त्यामुळे भारनियमामुळे पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढले तरी उसाची वाढ चांगली होते. शेतात पाचट ठेवल्यामुळे जमिनीचे तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसने थंड राखले जाते. शेतात गांडुळाची व उपयुक्त जीवाणूची नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते, त्यामुळे पांढर्या मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते. पाचटातील सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीचे भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारतात. जलसंधारण शक्ती वाढते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी भिगवणचे किरण पिसाळ यांनी उपस्थित शेतकर्यांना खोडवा व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन इत्यादी बाबीवर मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषी पर्यवेक्षक जी. डी. खंडागळे, कृषी पर्यवेक्षक सरडे व कृषी सहाय्यक जी. ए. खांडेकर व पी. बी. मोहोळकर यांनी केले होते. यावेळी राजेंद्र काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. पाचट ठेवल्याचे फायदे पाचट कुट्टी करून सरीमध्ये त्याचे आच्छादन केल्यास तण उगवत नाही. त्यामुळे भांगलणी व मशागतीच्या खर्चात जवळपास 50 टक्के बचत होते. कृषी संशोधन संस्थांच्या शिफारशीनुसार ऊस पिकास हेक्टरी 2.5 ते 3.5 कोटी लिटर पाण्याचा सिंचनासाठी वापर केला जातो. पाचट ठेवल्याने आपणास हेक्टरी 1.25 ते 1.50 कोटी लिटर पाण्याची व ते वहन करण्यासाठी आवश्यक सुमारे 100 ते 125 युनिट विजेची बचत होते. पाचट व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आपल्या शेतातून जे पाचट निघतं ते बारीक करून शेतातच गाडणे आणि त्याच्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती शेतातच करणे हे होय. यामध्ये पाचट कुट्टी मशीनच्या सहाय्याने पाचट बारीक करून घ्यावे. पाचट पूर्णपणे सरीत दाबून घेऊन बगला चिरून त्यावर माती टाकावी. त्याचवेळी पाचटावर एकरी दोन बॅग युरिया आणि दोन बॅग सुपर फॉस्फेट त्यासोबत पाचट कुजवणार्या जीवाणूंचे कल्चर ही टाकावे म्हणजे 80 ते 90 दिवसात हे पाचट कुजून जाईल. बांडेवाडी (पळसदेव) ः पाचट व्यवस्थापनाची माहिती देताना तालुका कृषी आधिकारी भाऊसाहेब रुपनवर.