राजगुरुनगर : खेड तालुक्यातील पाळू गावातील शेतकरी कुटुंबातील कन्या अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) हिने २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. तिच्या या यशाने खेड तालुक्यासह संपूर्ण राज्यात तिचे नाव गाजले. मात्र, दुर्दैवी अपघाताने तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर थांबली, आणि ती कायमची निघून गेली. २८ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे अभ्यासानंतर अश्विनी अंघोळीसाठी पाणी तापवत होती. पाण्याची उष्णता तपासण्यासाठी गेली असता बाथरूममध्ये हिटरचा विजेचा धक्का बसला आणि उकळते पाणी तिच्या अंगावर सांडले. या भीषण अपघातात ती ८० टक्के भाजली. तत्काळ तिला पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या अश्विनीवर उपचार सुरू होते, पण दुर्दैवाने ती या लढाईतून बाहेर पडू शकली नाही आणि तिचे निधन झाले. अश्विनीच्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत होता. यासाठी खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. अनेकांनी पुढाकार घेत तिच्या उपचारांसाठी हातभार लावला. मात्र, सगळ्यांच्या प्रयत्नांना नशिबाने साथ दिली नाही, आणि अश्विनीला वाचवणे शक्य झाले नाही. अश्विनीचे स्वप्न होते जिल्हाधिकारी होण्याचे. त्या दिशेने ती अथक परिश्रम करत होती. तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने ती एक आदर्श ठरली होती. पण नियतीच्या क्रूर खेळाने तिचे स्वप्न अपूर्ण राहिले. अश्विनीच्या निधनाने खेड तालुका, तिचे कुटुंब आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. तिच्या यशाने प्रेरणा घेणाऱ्या अनेकांसाठी ती नेहमीच एक चमकता तारा राहील.