पिंपरी | शेतकऱ्यांना लागले पावसाचे वेध

कान्हे, (वार्ताहर) – शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन करीत शिवारे पेरण्यासाठी सज्ज करून ठेवली आहेत. मावळमधील शेतकऱ्यांना पावसाचे वेध लागले आहे, असे असूनसुद्धा उन्हाचा तडाका वाढतच असल्याने जिवाची लाही लाही होत आहे.
पावसाचे प्रमाण घटतच चालल्याने परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. भूजल पातळी खोलवर जात असल्याने सिंचन झोन आता कोरडवाहू होत आहे. लाखो रुपये खर्च करूनही बोअरवेलला पाणी लागत नसल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर घसरत आहे. सिंचनावर अवलंबून असलेली पिके उन्हाच्या उकाड्याने करपू लागली आहेत.
या वर्षासाठी बाजारात बियाणे दाखल झाले असून पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ झाल्याने खते घेणे कठीण होऊन बसले आहे. मजुरीचे दरही दिवसाकाठी वाढतच चालल्याने शेतकरी हताश होत आहे.
महागडे बियाणे खरेदी करावी लागत असल्याने यावर अंकुश लावणे गरजेचे आहे. पेरणीसाठी आता शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु शेतकऱ्यांना पसंतीच्या बियाण्यांसाठी शोधाशोध करावी लागत आहे. बाजारात बियाणे मूळ किमती पेक्षा ऑन वर असल्याची चर्चा आहे.





