हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप; पिकविमा कार्यालयाची तोडफोड

हिंगोली : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही विमा कंपनीकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त क्रांतिकारी शेतकरी संघटनेने बुधवारी हिंगोलीतील पिकविमा कार्यालयात तोडफोड केली. तातडीने पिकविमा मंजूर करण्याची मागणी करत संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, हळद आणि ज्वारी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले असून, पिककर्ज आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने ३.५० लाख हेक्टरपैकी २.७१ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पिकविमा काढला असूनही विमा मंजूरीबाबत कंपनीकडून कोणतीही हालचाल नाही.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नामदेव पतंगे, सखाराम भाकरे, गजानन काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विमा कार्यालयात विचारणा केली असता, कर्मचाऱ्यांनी पिक नुकसानीच्या पाहणीसाठी शासन किंवा कंपनीकडून सूचना नसल्याचे सांगितले. पिकच नसताना कापणी प्रयोग कसा करणार, असा सवाल उपस्थित करत संतप्त पदाधिकाऱ्यांनी कार्यालयातील खुर्च्या, टेबल फोडले. विमा तातडीने न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.





