Farmer Suicide : अतिवृष्टीच्या नुकसानामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; हिंगोलीच्या वसई शिवारातील घटना

हिंगोली : पूर्णा ते हिंगोली रेल्वेमार्गावर वसई शिवारात अल्पभुधारक तरुण शेतकऱ्याने मालगाडी खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी ता. 11 पहाटे घडली आहे. गंगाधर लक्ष्मण सातपुते (35) असे मयत शेतकऱ्यांचे नांव आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. औंढा नागनाथ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यातील वसई येथील शेतकरी गंगाधर सातपुते यांना दिड एकर शेती आहे. या सोबत दुग्ध व्यवसाय व रोजमजुरी करतात. घरी आई, वडिल, दोन मुले, पत्नी व स्वतः गंगाधर असे सहा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतीवर चालतो. यावर्षी त्यांनी दिड एकर शेतामध्ये सोयाबीनचे पिक घेतले आहे. सध्या सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्र ता. १ व ता. २ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पिक पिवळे पडू लागले आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे पिक हातचे गेले असून आता लागवडीचा खर्च कसा निघेल व उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. त्यामुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून ते अस्वस्थ होते. आज पहाटेच ते घरून शेतात जातो असे सांगून निघाले होते. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारा त्यांच्या शेतालगतच असलेल्या रेल्वे रुळाजवळ बसले अन मालगाडी येताच त्यांनी त्यांनी मालगाडी खाली आत्महत्या केली.





