Farmer Protest – मुळशी, भोर आणि राजगड तालुक्यातील शेतकर्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘बोंबाबोंब’ आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवला. मुळशी तालुका शेतकरी संघाच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकर्यांनी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. आंबा पिकाच्या नुकसानभरपाईसाठी कोकणप्रमाणेच नियम व लाभ मुळशी, भोर व राजगड तालुक्यातील शेतकर्यांनाही लागू करावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. संबंधित भागाचा भौगोलिक स्वरूप कोकणसदृश असून आंबा हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन असल्याचे शेतकर्यांनी नमूद केले. तसेच अलीकडील गारपीट व अवकाळी पावसामुळे आंबा, कांदा, गहू व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना पुरेशी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. पंचनाम्यावेळी फळबाग विमा व पीक विम्याची अट रद्द करावी, अशीही भूमिका शेतकर्यांनी मांडली. सातबारा उतार्यावर झाडांची ऑनलाइन नोंद करताना अनेक अडचणी येत असल्याने तलाठी व महसूल विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नोंद करावी, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनात शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मारणे, भाऊ केदारी, विजय धुमाळ, राम गायकवाड, आनंदराव ढमाले, लक्ष्मण निकटे, दत्तात्रय उभे, महादेव मरगळे, तुकाराम मरे, जयवंत दहिभाते, रा. सू. शेलार, चंद्रकांत चोरघे, निवृत्ती येवले, चंद्रकांत रायरीकर, सोमनाथ कळमकर, रायबा उभे, दगडू मारणे, मनोहर पावळे, शरद गोडांबे, ऋतिक धुमाळ, विजय सोनवणे आदी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.