शेतकरी नेतेही हिंसाचारात सामील – दिल्ली पोलीस
Farmer leaders also involved in violence-Delhi Police

नवी दिल्ली – ट्रॅक्टर संचलनावेळी झालेल्या हिंसाचारात काही शेतकरी नेतेही सामील होते, असा दावा दिल्लीचे पोलीस प्रमुख एस.एन.श्रीवास्तव यांनी बुधवारी केला. हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकरी संघटनांच्या ट्रॅक्टर संचलनाला परवानगी देताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांचे पालन करण्याचे टाळून शेतकरी संघटनांनी विश्वासघात केला. काही शेतकरी नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केली. त्यानंतर गोंधळाला सुरूवात झाली.
प्रक्षोभक भाषणांसाठी काही उपद्रवी घटकांनाही पुढे करण्यात आले. हिंसाचारात 394 पोलीस जखमी झाले. तसेच, पोलिसांच्या 30 वाहनांचे नुकसान झाले. हिंसाचाराबद्दल 25 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हिंसाचारात सामील असणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही आणि व्हिडीओ फुटेजचा आधार घेतला जात आहे. हिंसाचारावेळी दिल्ली पोलिसांनी संयम बाळगला. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईत कुणाचाही मृत्यू झाला नाही, अशी भूमिका श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत मांडली.





