Hingoli News : आग्या मोहोळाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रूक येथे शेतात हरभरा गोळा करण्यासाठी गेलेल्या शेतकरी व त्यांच्या दोन मुलांवर मधमाश्यांनी हल्ला केला. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर मुले गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ता. २६ सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
भास्कर नाथराव खिल्लारे (४३) हे त्यांची मुले धनंजय व धम्मदीप यांच्या सोबत आज सकाळीच शेतात हरभरा काढणीच्या कामासाठी गेले होते. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तिघेही हरभरा काढण्यात व्यस्त असतांना अचानक आग्या महोळाच्या मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्लयामुळे तिघेही घाबरून गेले. त्यांनी मधमाश्या हटविण्याचा प्रयत्न केला.
मात्र तब्बल १० ते १२ हजार मधमाश्ांपुढे त्यांना बचावाची संधीही मिळाली नाही. यामध्ये भास्कर हे गंभीर जखमी होऊन खाली कोसळले तर धनंजय व धम्मदीप गंभीर जखमी झाले. या परिस्थितीतही धनंजय यांनी तातडीने गावात येऊन माहिती दिल्यानंतर सुनील खिल्लारे व नागोराव शिंदे यांनी शेतात जाऊन आग पेटवली. त्यानंतर मधमाशा भास्कर यांच्या पासून दूर झाल्या.





