Satara News : रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; कोयना विभागातील रासाटी येथील घटना

कोयनानगर : रासाटी येथून पाऊलवाटेने नानेल या आपल्या गावाला जाणाऱ्या शेतमजुराला वाटेत आलेल्या रानगव्याने हल्ला करुन त्यांच्या पोटात शिंग खुपसून कोथळा बाहेर काढल्याची घटना बुधवारी कोयना विभागात घडली. रानगव्याच्या या हल्ल्यात एकनाथ जाधव हा शेतमजूर जागीच ठार झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कोयना विभागातील दुर्गम असणाऱ्या नानेल गावाला जाण्यासाठी रासाटी येथून असणाऱ्या पायवाटेवरुन एकनाथ जाधव (५०) या शेतमजुरांवर १८ डिसेंबर बुधवारी रात्री १० वाजता हल्ला केल. या हल्ल्यात एकनाथ जाधव याला गंभीर दुखापत करुन त्याच्या पोटात शिंग खुपसले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
मृत एकनाथ जाधव याच्या घरातील लोकांनी जाधव यांचा दिवसभर शोध घेतला असता त्यांना या पायवाटेवर एकनाथ जाधव याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद कोयना पोलिसांत दिली असून कोयना पोलीस वन्यजीव विभागाच्या मदतीने घटनास्थळी दाखल झाले आहे. एकनाथ जाधव यांच्यावर रानगव्याने केलेल्या हल्ल्यात ते मृत झाले असल्याचे वन्यजीव विभागाने स्पष्ट केले आहे.





