Junnar : कर्जाचा बोजा सहन न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

जुन्नरः तालुक्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे. प्रकाश (पप्पु) सस्ते (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी चिक्कुच्या बागेत असलेल्या एका झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सस्ते यांनी शेतीसाठी आणि पशुपालनासाठी एका पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. सस्ते यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेबाबत मयताचे वडील दत्तात्रय महादू सस्ते यांनी ओतूर पोलिसांत खबर दिल्यानुसार पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक एल. जी. थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.
त्यांचे नातेवाईक व भाऊ निखील सस्ते यांनी संयुक्तपणे दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश सस्ते हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना एक एकर शेती होती. तसेच शेतीसोबतच जोडधंदा म्हणून त्यांनी पशुपालनाचा व्यवसाय करायचे. यासाठी त्यांनी जमिनीवर एका पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. तसेच हात उसने पैसे देखील घेतले होते. मात्र, त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढतच चालला होता. आपल्या कुटुबांचे भविष्यात कसे होणार याची चिंता त्यांना सतावित असल्याने त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे.
जुन्नरमध्ये आत्महत्येची अनेक उदाहणे
तालुक्यात अनेक बागायतदार शेतकरी आहेत. मात्र, नैसर्गिक आपत्ती आणि मालाला बाजारभाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

