‘फणी’ चक्रिवादळ उद्या दुपारपर्यंत ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याचा इशारा

नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तयार झालेले “फणी’ हे चक्रिवादळ ओडिशा कोस्ट ओलांडून पुरीच्या आसपास गोपीपूर आणि चांदबाली दरम्यान ३ मेच्या दुपारपर्यंत पोहचण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. या भागात ताशी १७५-१८५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग वाढत जाऊन ताशी २०५ किलोमीटर होण्याचा संभव असल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हंटले आहे.

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्वत्र दक्षतेचा इशारा देण्यात येत असल्याचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हंटले आहे. केंद्रीय वाहतूक उड्डयन मंत्रालयातर्फे बचाव व मदत कार्यासाठी सर्व प्रकारची मदत देण्याची सर्व विमानसेवांना विनंती करण्यात आली आहे. तर भारतीय नौदलाने देखील मदत कार्यासाठी सज्ज असल्याचे म्हंटले आहे.  आज मध्य रात्रीपासून पुढील २४ तासापर्यंत भुवनेश्वर विमानतळावरून सर्व विमानांचे उड्डाण स्थगित करण्यात आली आहेत.

या चक्रिवादळामुळे समुद्र खवळलेला असणार असल्याने मच्छिमारांनीही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंध्रप्रदेशमध्ये ‘फणी’ चक्रिवादळ आज धडकले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. फणी चक्रिवादळचा इशारा हवामान विभागाने केवळ आंध्रप्रदेश आणि ओडिशाला दिला होता. परंतु, आता उत्तरप्रदेशमध्येही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.